कऱ्हाडात घरात घुसून युवकाचा निर्घृण खून
By Admin | Published: January 1, 2017 11:13 PM2017-01-01T23:13:44+5:302017-01-01T23:13:44+5:30
भरदिवसा घटना : धारदार शस्त्राने डोक्यात वार; हल्लेखोर पसार; कारणही अद्याप अस्पष्ट
कऱ्हाड : वीज वितरण कंपनीत सहायक लेखा व्यवस्थापक असलेल्या युवकाचा अज्ञातांनी भरदिवसा घरात घुसून निर्घृण खून केला. हल्लेखोरांनी संबंधित युवकाच्या डोक्यात कोयत्याने गंभीर वार केले. त्यामुळे अतिरक्त स्राव होऊन जागीच त्याचा मृत्यू झाला. शहरानजीकच्या गजानन हौसिंग सोसायटीतील चौंडेश्वरीनगरमध्ये रविवारी दुपारी दीडच्या सुमारास ही घटना घडली.
विजय रामचंद्र पवार (वय २८, रा. गजानन हौसिंग सोसायटी, कऱ्हाड) असे खून झालेल्याचे नाव आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, शहरानजीकच्या गजानन हौसिंग सोसायटीत विजय पवार हा युवक त्याच्या आईसमवेत वास्तव्यास होता. कऱ्हाड-विटा मार्गालगत त्यांचे राहते घर असून, घरासमोरच दुकानगाळे आहेत. तसेच घराच्या एका भागात चौंडेश्वरी पतसंस्था व वीजबिल भरणा केंद्र आहे. विजयचे वडील रामचंद्र पवार हे वीज कंपनीत नोकरीस होते. त्यांच्या निधनानंतर विजय त्या ठिकाणी रुजू झाला. सुरुवातीला तो वीज कंपनीच्या कऱ्हाड येथील प्रमुख भांडारामध्ये उच्चस्तर लिपिक म्हणून नोकरीस होता. त्यानंतर त्याची सहायक लेखा व्यवस्थापक म्हणून सांगली-विश्रामबाग येथे बदली झाली. सध्या तो विश्रामबाग येथेच नोकरी करीत होता.
काही दिवसांपूर्वी विजयच्या आईची डोळ्यांची शस्त्रक्रिया झाली आहे. त्यामुळे ती मुलीकडे राहण्यासाठी गेली होती. विजयच्या घरासमोरच त्याच्या एका बहिणीचे घर आहे. त्याठिकाणी त्याची बहीण, तिचे पती व मुली वास्तव्यास आहेत. रविवारी सुटी असल्याने सकाळपासून विजय घरामध्येच होता. दुपारी बाराच्या सुमारास त्याचा सदा नामक मित्र घरी आला. विजयने त्याची कार धुण्यासाठी सदाकडे दिली. कार घेऊन सदा तेथून निघून गेला. दरम्यान, काही वेळानंतर भाची चैताली ही विजयचे जेवण घेऊन घरी आली होती. जेवणाचे ताट देऊन ती परत तिच्या घराकडे गेली. दुपारी एकच्या सुमारास सदाने विजयला फोन केला. सर्व्हिसिंग सेंटरवर गर्दी असल्याचे त्याने त्याला सांगितले. यावेळी ‘कार धुवायची राहू दे, तू घरी ये,’ असे विजयने त्याला सांगितले. त्यानंतर काही वेळातच सदा कार घेऊन घरी गेला. अंगणात कार उभी केल्यानंतर सदा घरामध्ये गेला असता एका खोलीत विजय रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे त्याला दिसला. त्यामुळे सदाने धावत जाऊन याबाबतची माहिती विजयची बहीण व दाजीला दिली. त्यानंतर नागरिकही त्याठिकाणी जमा झाले.
या घटनेची माहिती मिळताच कऱ्हाड शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रमोद जाधव, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक निरीक्षक संतोष चौधरी हे अधिकारी व कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. तसेच ठिकठिकाणी नाकाबंदी करून हल्लेखोरांचा शोध घेतला. मात्र, हल्लेखोर पसार झाले. विजयचा खून कोणी आणि कशासाठी केला, याबाबतची माहिती पोलिसांना रात्री उशिरापर्यंत मिळाली नव्हती. घटनेची नोंद कऱ्हाड शहर पोलिसांत झाली आहे. पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)
टीव्ही मोठ्या आवाजात सुरू
घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस अधिकारी तातडीने त्याठिकाणी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. त्यावेळी विजयचा ज्या खोलीत खून झाला, त्या खोलीतील टीव्ही मोठ्या आवाजात सुरूच असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तसेच विजय जमिनीवरील चटईवर रक्ताच्या थारोळ्यात पडला होता.
डोक्यात शस्त्राने नऊ वार
डोक्याव्यतिरिक्त विजयच्या शरीरावर इतर कोठेही जखमा नसल्याचे पोलिसांनी सांगितले. हल्लेखोराने विजयच्या डोक्यात धारदार शस्त्राने नऊ वार केले आहेत. नऊपैकी बहुतांश वार खोलवर गेले असून, काही वार चेहऱ्यावर व कानावरही आहेत. या गंभीर वारामुळेच त्याचा जागीच मृत्यू झाला असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.