गर्दीच्या रस्त्यावर युवकांची ‘कट’बाजी!

By admin | Published: January 22, 2017 11:58 PM2017-01-22T23:58:35+5:302017-01-22T23:58:35+5:30

कऱ्हाडात दुचाकीस्वार सुसाट : प्रीतिसंगम घाटावर अनेकांचा स्टंट; आवाजानेच नागरिकांना धडकी, वेग उठतोय जीवावर

Youth's 'cut' on the crowded streets! | गर्दीच्या रस्त्यावर युवकांची ‘कट’बाजी!

गर्दीच्या रस्त्यावर युवकांची ‘कट’बाजी!

Next



कऱ्हाड : येथील प्रीतिसंगम घाट हा शहरवासीयांसाठीचा अनमोल ठेवा. सकाळ आणि सायंकाळी या बागेच्या परिसरात नागरिकांसह लहान मुलांची तोबा गर्दी असते. मात्र, या गर्दीतून वाट काढत अनेक सुसाट दुचाकीस्वार ‘कट’ मारताना दिसतात. त्यांच्या महागड्या दुचाकीच्या आवाजानेच अनेकवेळा नागरिकांना धडकी भरते. तसेच बेफाम वेगही काहींच्या जिवावर बेततो. मात्र, कारवाईच होत नसल्याने अशा हुल्लडबाज युवकांची कटबाजी दिवसेंदिवस वाढतच असल्याचे दिसते.
कऱ्हाड शहरातील दत्त चौकापासून आझाद चौक, चावडी चौक मार्गे कन्या शाळेपर्यंत मुख्य बाजारपेठ आहे. बाजारपेठेतील रस्ता अरुंद असून, सम-विषम तारखेप्रमाणे या रस्त्यावर पार्किंगही होते. या रस्त्यावर सायंकाळी पाच ते रात्री आठ वाजेपर्यंत चारचाकी वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. यामुळे पेठेतील रात्रीचा वाहतूक कोंडीचा प्रश्न निकालात निघाला आहे. या गर्दीच्या रस्त्यावरच धूमस्टाईल दुचाकीस्वारांनी अक्षरश: धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. या रस्त्यावरच काही विद्यालये आहेत. सकाळी व सायंकाळी येथे मुलांचीही मोठ्या प्रमाणात गर्दी असते. तसेच सायंकाळी नागरिक खरेदीसाठी बाजारपेठेत येतात. अशातच दुचाकीस्वार भरधाव वेगात जात असल्याने मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. यापूर्वी अनेकवेळा भरधाव दुचाकीस्वारांमुळे अपघात घडले आहेत. त्याची पोलिस दप्तरी नोंदही झाली आहे. मात्र, धूमस्टाईल दुचाकीस्वारांवर वचक निर्माण करण्यास वाहतूक शाखा अपयशी ठरत असल्याचे दिसते. अशा दुचाकीस्वारांवर कारवाईची मोहीम राबविणे गरजेचे असताना वाहतूक शाखेचे याकडे पूर्णत: दुर्लक्ष झाले आहे. परिणामी, याचा गैरफायदा अनेक दुचाकीस्वार घेत आहेत.
बाजारपेठेबरोबरच महाविद्यालय परिसरातही दुचाकीस्वारांची धूमस्टाईल अनेकांची डोकेदुखी बनली आहे. वाहतुकीचे सगळे नियम धाब्यावर बसवून चालवली जाणारी वाहने येथे अनेकदा अपघातांना कारणीभूत ठरली आहेत. पोलिसांनी धूमस्टाईलच्या विरोधात कंबर कसण्याची गरज आहे. गजबजलेल्या वस्तीत असे दुचाकीस्वार धूमस्टाईलने जातात. त्यामुळे ते दुसऱ्या वाहनाला जाऊन धडकतात.
प्रीतिसंगम बागेच्या परिसरात दुचाकीस्वार युवकांची ही हुल्लडबाजी हमखास पाहायला मिळते. वास्तविक, या बागेत दररोज शेकडो नागरिक व लहान मुले फिरण्यासाठी येतात. बागेकडे जाताना उताराचा रस्ता आहे. या रस्त्याच्या एका बाजुस दुचाकी तर एका बाजूस चारचाकी वाहने उभी केलेली असतात. उरलेल्या रस्त्यातून वाट काढत नागरिक बागेपर्यंत पोहोचतात. मात्र, याच गर्दीत काही दुचाकीस्वार सुसाट दुचाकी चालविताना आढळून येत आहेत. तसेच येथे अनेकवेळा युवकांकडून स्टंटबाजीही केली जाते. नागरिकांना आकर्षित करण्यासाठी केली जाणारी ही स्टंटबाजी अपघाताला निमंत्रण देणारी असते. गत काही वर्षांपूर्वी शहर पोलिस ठाण्याच्या वाहतूक शाखेचा पदभार सहायक पोलिस निरीक्षक विद्या जाधव यांच्याकडे असताना प्रीतिसंगम परिसरात वेगात दुचाकी चालविणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी युवकांना दुचाकी ढकलत पोलिस ठाण्यापर्यंत आणण्यात आले होते. (प्रतिनिधी)

Web Title: Youth's 'cut' on the crowded streets!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.