युवकांनो उद्योजक होण्याचा निर्धार करा, केंद्र सरकार पाठीशी; नारायण राणेंची नवउद्योजकांना साद
By दीपक देशमुख | Published: May 12, 2023 04:39 PM2023-05-12T16:39:28+5:302023-05-12T16:39:52+5:30
'राजकारणाऐवजी उद्याेगात बुद्धी वापरा'
सातारा : आपले जीवनमान उंचावयाचे असेल तर उद्योग हाच सर्वात चांगला मार्ग आहे. छत्रपती शिवरायांनी वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी निर्धार केला आणि मराठा साम्राज्य निर्माण केले. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा व युवकांनी उद्योजक होण्याचा निर्धार करावा, केंद्र सरकार तुमच्या पाठीशी आहे, अशी ग्वाही केंद्रीय लघु उद्योजक मंत्री नारायण राणे यांनी दिली. दरम्यान यावेळी सातारा जिल्ह्यासाठी सुमारे २०० कोटी रुपयांचे उद्योजक प्रशिक्षण केंद्र देण्याचेही आश्वासन त्यांनी दिले.
सातारा येथे खासदार उदयनराजे भोसले यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात पश्चिम महाराष्ट्र उद्योग परिषद पार पडली. याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. व्यासपिठावर केंद्रीय अर्थ राज्य मंत्री भागवत कराड, आमदार जयकुमार गोरे, आ. महेश शिंदे, खा. संजयकाका पाटील, मावळ मतदार संघाचे आ. संजय भेगडे, अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, आनंदराव पाटील, मदन भोसले, धैर्यशील कदम, भरत पाटील, पुरुषोत्तम जाधव, मासचे अध्यक्ष राजेंद्र मोहिते आदी उपस्थित हाेते.
यावेळी राणे म्हणाले, धीरुबाई अंबानींनी शुन्यातून मोठा उद्योग उभा केला. मराठी माणसानेही असे मोठे उद्योजक व्हावे. मराठा माणूस थोडे पैसे यायला आले की त्याच्यात लगेच बदलतो. कितीही पैसे आले तरी पाय जमीनीवर हवेत. एकाच व्यवसायावर न विसंबता अनेक उद्योग सुरू करावेत. कल्पकतेतून वेगळे काय देवू शकतो, याचा विचार करून मार्केटिंग करावे.
३० लाख वस्ती असलेल्या सातारा जिल्ह्यात फक्त ६८ हजार उद्योजक आहेत. जिल्ह्याचे दरडोई, साक्षरता वाढली पाहिजे. येथील साधनसामुग्रीचा विचार करून उद्योग वाढायला हवा. केंद्र शासन लघू ५० ते १०० मध्यम २५० कोटीपर्यंत कर्ज देेते. तुमच्याकडे जागाहवी, बाकी आधुनिक तंत्रज्ञान, मार्गदर्शन, प्रशिक्षण असे सर्व केंद्रशासन उपलब्ध करते. युवकांनी पुढे यावे, अशी साद राणे यांनी घातली.
यावेळी भागवत कराड म्हणाले, सातारा सारख्या शहरात उद्योग वाढतील, यासाठी उद्योग परिषदा होण्याची गरज आहे. जिल्ह्यात ७८ बँकेच्या ब्रँच वाढण्याच्या सुचना केल्या आहेत. बँकेतून उद्योजकांना कर्ज वितरणाबत असणाऱ्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल. महाराष्ट्रात चार डीजिटल बँका उघडायच्या आहेत. त्यापैकी एक बँक सातारा येथे असून त्याचे कामकाज सुरू आहे.
राजकारणाऐवजी उद्याेगात बुद्धी वापरा
सातारची लोक हुशार आहेत. राजकारणात जी बुद्धीमत्ता आपण वापरतो, तेवढी त्यातील चारआणे उद्योगात वापरली रिझल्ट एक रुपाया मिळेल. सातारा जिल्ह्याने राज्याला मुख्यमंत्री दिले आहेत, असेही राणे म्हणाले.