विद्यानगरमध्ये वाढली युवकांची दादागिरी
By Admin | Published: July 17, 2017 02:39 PM2017-07-17T14:39:33+5:302017-07-17T14:39:33+5:30
रोजचाच राडा : पोलीस चौकीची गरज
आॅनलाईन लोकमत
कऱ्हाड : विद्येचे माहेरघर असलेल्या विद्यानगरचे सामाजिक स्वास्थ्य सध्या बिघडले आहे. युवकांच्या गटात मारामारीच्या घटना घडत असल्याने येथे अनेकवेळा गोंधळ निर्माण होतो. ही गुंडगिरी रोखण्यासाठी विद्यानगरला पोलीस चौकी उभारणे गरजेचे बनले आहे.
विद्यानगर येथे रोज कोणत्या ना कोणत्या कारणाने युवकांचा राडा सुरु असतो. अशा घटनांची माहिती कऱ्हाड शहर पोलिसांना मिळून ते त्याठिकाणी पोहोचेपर्यंत युवक तेथून पसार होतात. साहजिकच त्यांच्यावर काहीच कारवाई होत नाही. संबंधित युवकांवर कोणाचाच धाक नसल्याची परिस्थिती आहे. रस्ता रूंदीकरण होण्यापुर्वी गाडगे महाराज महाविद्यालयानजीक पोलीस चौकी होती. या चौकीमुळे युवकांवर पोलिसांचा वचक असायचा. मात्र, रस्ता रुंदीकरणात पोलीस चौकी पाडल्याने येथे पोलिसांची वर्दळ कमी झाली आहे. परिणामी, युवकांवरील वचकही कमी झाला आहे. किरकोळ कारणावरुन गटागटात वारंवार भांडणे होत आहेत. काही वाद तडजोडीने मिटतात. तर काही वारंवार धुमसत राहतात. या वादावादीचा त्रास महाविद्यालयीन युवती, व्यावसायीक व परिसरातील नागरीकांना सहन करावा लागतो.
परिसरात यापुर्वी चोरीच्याही गंभीर घटना घडल्या आहेत. पोलीस चौकी असताना महाविद्यालय परिसरात पोलिसांची वर्दळ असायची. तसेच चौकीत दिवसभर किमान एक कर्मचारी तरी उपस्थित असायचा. रात्रीच्यावेळी पोलिसांची गस्त हमखास व्हायची. मात्र, सध्या चौकीच नसल्याने पोलीस या परिसरात क्वचितच येतात. परिणामी, येथे गुन्हेगारी कारवाया वाढल्याचे दिसून येत आहे. वाहने बेदरकारपणे चालवण्याचे प्रमाणही वाढल्याने अपघात होत आहेत. हे प्रकार रोखण्यासाठी विद्यानगरला पोलीस चौकी होणे गरजेचे आहे.