जकातवाडी-सांबरवाडीत बिबट्याचा धुमाकूळ..!
By admin | Published: January 4, 2017 10:27 PM2017-01-04T22:27:28+5:302017-01-04T22:27:28+5:30
यवतेश्वरमध्ये हल्ला : दोन शेळ्या ठार; नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पेट्री :
सातारा शहर परिसरात असणाऱ्या किल्ला, डोंगरात बिबट्याचा वावर असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. शहरानजीकच असणाऱ्या यवतेश्वर येथे बिबट्याने हल्ला करून दोन शेळ्या फस्त केल्या. ही घटना मंगळवारी दुपारी साडेचारच्या सुमारास घडली. दरम्यान, जकातवाडी, सांबरवाडी येथे ही बिबट्याने धुमाकूळ घातला असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यवतेश्वर येथील शंकर नामदेव सपकाळ हे गावापासून जवळ शेळ्या चारण्यासाठी गेले होते. दुपारी साडेचारच्या सुमारास शेळ्या ओरडण्याचा त्यांना आवाज आला. त्यामुळे ते आवाजाच्या दिशेने धावत गेले तर बिबट्याने एका शेळीला जागेवर ठार केले होते तर दुसऱ्या शेळीच्या नरडीला धरून बिबट्या जाळीत ओढत नेत होता. असे असतानाही सपकाळ यांनी बिबट्याला हटकण्याचा प्रयत्न केला. परंतु तो फोल ठरला. तिसरी शेळी मात्र यामधून बालंबाल बचावली. दोन्ही शेळ्यांची बिबट्याने नरड्याची घाटी फोडली. त्यातून बिबट्याने रक्त पिले. या प्रकाराची माहिती यवतेश्वर गावात समजल्यानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यामुळे बिबट्या तेथून पसार झाला. (वार्ताहर) मदतीचे आश्वासन... वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती मिळाल्यानंतर अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी भेट देऊन पंचनामा केला. सपकाळ यांना तातडीची मदत देण्याचे आश्वासन यावेळी त्यांनी दिले. दरम्यान, या घटनेमुळे रानात जाण्यासाठी लोक धजावत नाहीत. यापूर्वी बिबट्याने कुत्र्यांवरही हल्ला केला होता. त्यामुळे नागरिकांमध्ये अद्याप दहशतीचे वातावरण आहे. तसेच या परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे.