गर्दी टाळण्यासाठी जिल्हा परिषदेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:40 AM2021-03-26T04:40:04+5:302021-03-26T04:40:04+5:30

कोरोना कारण : कामांचा जलद गतीने निपटारा होण्याचा प्रशासनाला विश्वास लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्ह्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण ...

In the Zilla Parishad to avoid crowds | गर्दी टाळण्यासाठी जिल्हा परिषदेत

गर्दी टाळण्यासाठी जिल्हा परिषदेत

Next

कोरोना कारण : कामांचा जलद गतीने निपटारा होण्याचा प्रशासनाला विश्वास

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : जिल्ह्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत चालले आहे. यामुळे जिल्हा परिषदेत कामासाठी मोठ्या संख्येने येणाऱ्या लोकांमुळे कोरोनाचा धोका निर्माण होऊ शकतो. याचा विचार करून सातारा जिल्हा परिषदेत ‘ई टपाल प्रणाली’ सुरू करण्यात आली आहे. यामुळे प्रशासकीय कामकाज गतिमान होईल. त्याचबरोबर प्राप्त अर्ज, निवेदन, समस्या आणि मागणीचा निपटारा जलद गतीने होईल, असा विश्वास प्रशासनाला आहे.

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्यातच सध्या जिल्हा परिषदेच्या विविध विभागात मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. दररोज शेकडो नागरिक कामासाठी येतात. या पार्श्वभूमीवर कोरोना विषाणूचा प्रसार जिल्हा परिषदेतील विभागामध्ये होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून गर्दी कमी करणे आवश्यक ठरले आहे. तसेच कार्यालयात येणार्‍या अभ्यागतांना वेळ न दिल्यास त्यातून गैरसमज निर्माण होऊ शकतात. जिल्हा परिषदेमध्ये येणार्‍या नागरिकांबरोबर चर्चा करण्यात जास्त वेळ जातो. त्यामुळे प्रशासकीय कामकाजास वेळ कमी पडण्याची शक्यता असते. नागरिकांनाही खूप दूरवरून पैसा, वेळ खर्च करून यावे लागते. त्यांचाही वेळ आणि पैसा वाचविणे आवश्यक आहे.

कामानिमित्त जास्त दूरवरून नागरिक येतात. मात्र, अधिकारी कार्यालयात हजर नसतील किंवा दौर्‍यावर, सभेला उपस्थित राहण्यासाठी गेल्यास कामानिमित्त आलेल्या नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो. या सर्व बाबींचा विचार करून जिल्हा परिषदेमध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून ‘ई टपाल प्रणाली’चा वापर करण्याचे विचाराधीन होते. त्यानुसार सुरुवात करण्यात आली आहे.

या प्रणालीमुळे प्रशासकीय कामकाज गतिमान होण्यास मदत होणार आहे. अर्ज, निवेदने, समस्या व मागणीचा निपटारा जलद गतीने होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेमध्ये अभ्यागतांची व नागरिकांची संख्या कमी करण्यासाठी ही प्रणाली महत्त्वपूर्ण ठरणार आहे. तर नागरिक, कर्मचार्‍यांचे अर्ज, निवेदने, मागणी, सूचना पत्रके, जिल्हा परिषदेच्या इ मेल आयडीवर ऑनलाईन सादर करावीत. अर्जाचा तपशिल संक्षिप्तपणे नोंद करून पाठविता येईल. निवेदन देणार्‍याचे नाव, मोबाईल क्रमांक आदी तपशिल देणे बंधनकारक आहे. शासन आदेशानुसार निनावी अर्जाची दखल घेतली जाणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

चौकट :

प्रणालीचा वापर करण्याचे आवाहन...

जिल्हा परिषदेच्या माहिती व तंत्रज्ञान कक्षामधून अभ्यागतांनी सादर केलेल्या अर्जाचे सनियंत्रण केले जाणार आहे. अर्ज दैनंदिन स्वरूपात आयटीसेल यांच्यामार्फत संबंधित विभागाकडे पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर प्रत्येक आठवड्यात सोमवारी होणार्‍या खातेप्रमुखांच्या बैठकीत याबाबत आढावा घेतला जाणार आहे. जिल्हा परिषदेतील गर्दी कमी करून प्रशासनास कामकाजासाठी पुरेसा वेळ देणे व कोरोनाच्या प्रादुर्भाव कमी करण्यासाठी नागरिक, अभ्यागत, लोकप्रतिनिधी व क्षेत्रीय अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी ‘ई टपाल प्रणाली’चा जास्तीत जास्त वापर करावा, असे आवाहनही जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा व सामान्य प्रशासनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव यांनी केले आहे.

.........................................................................

Web Title: In the Zilla Parishad to avoid crowds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.