जिल्हा परिषद सभेत माईकसाठी ओढाओढ !

By admin | Published: June 19, 2015 11:38 PM2015-06-19T23:38:22+5:302015-06-20T00:41:05+5:30

या गोंधळामुळे सभागृहातील वातावरण आठवडा बाजाराप्रमाणे झाले होते.

Zilla Parishad meeting for Mike! | जिल्हा परिषद सभेत माईकसाठी ओढाओढ !

जिल्हा परिषद सभेत माईकसाठी ओढाओढ !

Next

सातारा : सातारा जिल्हा परिषदेच्या शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत जिल्हा परिषद सदस्यांमध्ये माईकची भलतीच ओढाओढ झाली. ‘मला बोलायचे आहे,’ असा आग्रह धरणाऱ्या अनेकांचा या चढाओढीत आवाज दाबला गेला. सभागृहातील प्रत्येक सदस्यांसमोर माईकची व्यवस्था केली जावी, अशी मागणीही यावेळी अनेकांनी व्यक्त केली. जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा शुक्रवारी दुपारी एक वाजता झाली. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष माणिकराव सोनवलकर होते. उपाध्यक्ष रवी साळुंखे, मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन पाटील यांच्यासह इतर सदस्यांची यावेळी उपस्थिती होती. या सभेवेळी सत्ताधारी राष्ट्रवादीसह काँगे्रसचेही सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभागृहामध्ये पूर्वीसारखे प्रत्येक टेबलवर माईक उपलब्ध नव्हते. केबल लेस दोन माईक सभागृहात फिरविताना जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची दमछाक होताना दिसत होती. त्यातच सभा सुरू झाल्यानंतर सदस्यांमध्ये विषय मांडण्यासाठी चढाओढ सुरू झाली. सुरुवातीला सभागृहात मागच्या बाजूला बसलेले सदस्य राहुल कदम व सदाभाऊ पवार यांनी आपले विषय मांडले. त्यामुळे माईक मागच्या बाजूला होता. दुसरा माईक पुढच्या बाजूला राष्ट्रवादीचे सदस्य बसलेल्या ठिकाणी होता. राजू भोसले, सतीश धुमाळ यांच्याकडे हा माईक होता. माईक असणाऱ्यांचा आवाज मोठा असल्याने त्यांचेच म्हणणे ऐकून घेतले जात होते. दरम्यान, या काळात काँगे्रसच्या सदस्यांमधून गोंधळ सुरू झाला. आपल्याला बोलूनच दिले जात नसल्याची नाराजी काँगे्रसच्या महिला सदस्या व्यक्त करत होत्या. काँगे्रसचे सातारारोडचे सदस्य अविनाश फाळके व भाजपचे दीपक पवार शेजारी-शेजारी बसले होते. त्यांनीही याबाबत नाराजी व्यक्त केली.
माईक मिळत नसल्याने काँगे्रसचे सदस्य नाराजी व्यक्त करत असताना राष्ट्रवादीच्या सदस्यांनी आपले बोलणे सुरूच ठेवले.
अध्यक्ष माणिकराव सोनवलकर यांनी वारंवार सूचना करून बोलायला सारखे-सारखे उठणाऱ्या सदस्यांना थांबविले. मात्र, अनेकांनी माईकच सोडला नाही, त्यामुळे गोंधळात आणखी भर पडली. या गोंधळामुळे सभागृहातील वातावरण आठवडा बाजाराप्रमाणे झाले होते. जगदीश जगताप, राहुल कदम या सदस्यांनी यावेळी नाराजी व्यक्त करून प्रत्येक सदस्याला माईक उपलब्ध करून देण्याची मागणी केली. (प्रतिनिधी)


भ्रष्टाचाराचा आरोप
पाटण तालुक्यातील ३६ शिक्षकांची मेडिकल बिले शिक्षण विभागाने अडकवली आहेत. सोयीच्या बदलीसाठी पैसे घेतले जातात आणि जो पैसे देत नाही त्याची गैरसोय केली जाते. एनआरएचएमच्या भरतीमध्येही मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप पाटणचे सदस्य सदाशिव जाधव यांनी केला. तसेच दोन्ही विभागांत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली. उपाध्यक्ष रवी साळुंखे यांनी नावे जाहीर करण्याची सूचना केल्यानंतर नावासकट माणसं हजर करतो, असेही त्यांनी सांगितले.

अविनाश फाळकेंच्या बोलण्यामुळे हशा
अविनाश फाळके यांनी एक किस्सा सांगितला. ‘मला जिल्हा परिषदेच्या बाहेर अधिकारी ओळखत नाहीत,’ असे सांगून त्यांनी सभागृहात हंशा पिकविला. बोलत असताना माईक सुरू होत नसल्याने तो त्यांनी भिरकावून दिला.

Web Title: Zilla Parishad meeting for Mike!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.