जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी पुरुषांना संधी!

By admin | Published: November 18, 2016 11:24 PM2016-11-18T23:24:49+5:302016-11-18T23:24:49+5:30

नेतेमंडळींमध्ये चैतन्य

Zilla Parishad presents men for president! | जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी पुरुषांना संधी!

जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी पुरुषांना संधी!

Next

सातारा : जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण महिला राखीवऐवजी खुले झाल्याने जिल्ह्यातील अनेक मातब्बरांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. वर्षानुवर्षे गट मजबूत ठेवण्यासाठी जिवाचे रान करणाऱ्या राजकीय मंडळींना आता अध्यक्षपदाची संधी खुणावू लागली आहे.
सलग दहा वर्षे आलेले महिला आरक्षण बदलण्याचा निर्णय शुक्रवारी मुंबईत झाला. या निर्णयात सातारा जिल्हा परिषदेचाही समावेश झाला. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद महिला राखीव झाले होते; परंतु ते बदलून खुले झाले. या आरक्षण बदलामुळे खुल्या प्रवर्गातील नेतेमंडळींमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे.
जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी आता कुणाचे नाव पुढे येईल, याचीही चर्चा या आरक्षण सोडतीनंतर जिल्हाभर सुरू झाली. विधान परिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांचे बंधू जिल्हा परिषद उपाध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांना यानिमित्ताने संधी उपलब्ध झाली आहे. त्यांच्या नावाची चर्चाही फलटण तालुक्यात जोरदार रंगू लागली आहे. फलटण तालुक्यातील तरडगाव, हिंगणगाव किंवा गिरवी हे गट खुले असल्याने यापैकी कुठल्याही गटातून संजीवराजे निवडणूक लढवू शकतात.
माजी खासदार लक्ष्मणराव पाटील व आमदार मकरंद पाटील यांचे निकटवर्ती तसेच खंडाळा पंचायत समितीचे सभापती नितीन भरगुडे-पाटील यांनाही आता अध्यक्षपदी संधी मिळू शकते, अशी चर्चा वाई, खंडाळा, महाबळेश्वर या तालुक्यांमध्ये सुरू झाली आहे. त्यांचा शिरवळ गटही खुला असल्याने भरगुडे-पाटलांचे नाव जोरदार चर्चेत आले आहे. त्यांनी याआधी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपद सांभाळले आहे.
शेंद्रे गटातून खासदार उदयनराजे भोसले यांचे निकटवर्ती व जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व अर्थ समिती सभापती सुनील काटकर यांच्याही नावाची चर्चा सातारा तालुक्यात सुरू झाली. कऱ्हाड तालुक्यातील मसूर गट खुला असल्याने राष्ट्रवादीचे नेते मानसिंगराव जगदाळे यांचे नाव यानिमित्ताने या तालुक्यात जोरदार चर्चेत आले आहे.

या गटांतील विजयी उमेदवारांना संधी
खंडाळा तालुक्यातील शिरवळ, खेड बुद्रुक, जावळी तालुक्यातील कुडाळ, म्हसवे, सातारा तालुक्यातील शेंद्रे, वर्णे, फलटण तालुक्यातील तरडगाव, हिंगणगाव, गिरवी, कोरेगाव तालुक्यातील पिंपोडे बुद्रुक, ल्हासुर्णे, वाठार किरोली, पाटण तालुक्यातील मल्हारपेठ, म्हावशी, मंद्रुळकोळे, कऱ्हाड तालुक्यातील मसूर, कोपर्डे हवेली, तांबवे, येळगाव, विंग तसेच माण तालुक्यातील आंधळी या जिल्हा परिषद गटातील निवडून येणारे उमेदवार अध्यक्षपदासाठी दावेदार राहतील.
 

Web Title: Zilla Parishad presents men for president!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.