जिल्हा परिषद शाळेच्या भिंती बनल्या सेल्फी पाॅईंट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:38 AM2021-03-16T04:38:06+5:302021-03-16T04:38:06+5:30
वडगाव हवेली : खासगी शाळांच्या झगमगाटात जिल्हा परिषद शाळांचे महत्त्व कमी करण्याचा अनेकदा प्रयत्न झाला. मात्र ग्रामीण शिक्षण व्यवस्थेचा ...
वडगाव हवेली : खासगी शाळांच्या झगमगाटात जिल्हा परिषद शाळांचे महत्त्व कमी करण्याचा अनेकदा प्रयत्न झाला. मात्र ग्रामीण शिक्षण व्यवस्थेचा कणा असलेल्या जिल्हा परिषद शाळांनीही स्पर्धेच्या युगात आपले महत्त्व टिकवून ठेवले आहे. याचे लक्षवेधी उदाहरण ठरत आहे दुशेरे जिल्हा परिषद शाळेची इमारत. या शाळेच्या भिंती तर विद्यार्थ्यांना आकर्षित करतच आहेत, शिवाय युवा पिढीलाही या भिंतींसोबत सेल्फी काढण्याचा मोह आवरत नाही. त्यामुळे जिल्हा परिषद शाळेच्या या भिंती सेल्फी पॉईंट ठरल्या आहेत.
कऱ्हाड तालुक्यातील दुशेरे ग्रामपंचायतीने जिल्हा परिषद शाळा टिकविण्यासाठी प्रयत्न केले. या शाळेतील विद्यार्थी संख्या वाढती राहावी यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवले. याच पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत व समग्र अनुदानातून जिल्हा परिषद शाळेच्या भिंतींवरती आकर्षक चित्रे काढून विद्यार्थ्यांसाठी तसेच युवकांसाठी तो सेल्फी पॉईंट बनू लागला आहे.
ग्रामपंचायतीच्या १४ व्या वित्त आयोगातून एक खोली तसेच जिल्हा परिषदेच्या माध्यमातून एक खोली बांधण्यात आलेल्या शाळेच्या नवीन खोलीचे काम पूर्ण झाले आहे. त्या खोल्यांना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून रंगकाम करण्यात आले असून विद्यार्थ्यांना शाळेविषयी गोडी लागावी यासाठी शाळेच्या भिंतींवरती विविध प्रकारची चित्रे काढण्यात आली आहेत. शाळेतील विद्यार्थ्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी तो विद्यार्थी विशेष असणाऱ्या चित्रासमोर जाऊन सेल्फी काढतो. तसेच या बोलक्या भिंती गावातील तरुणांसाठी सेल्फी पॉईंट बनू लागला आहे.
दुशेरे गावातील मध्यवस्तीमध्ये शाळेची भव्य इमारत आहे. यामध्ये पहिली ते सातवीपर्यंत वर्ग भरतात. या शाळेचे मुख्याध्यापक, उपशिक्षक व शिक्षक यांचे शाळेच्या गुणवत्ता वाढीसाठी सतत प्रयत्न सुरू आहेत. तसेच गावातील इंग्रजी माध्यमाकडे वळलेल्या विद्यार्थ्यांना मराठी शाळेकडे आकर्षक करण्यासाठी शाळेने या बोलक्या भिंतीच्या उपक्रमातून जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक प्रयत्न करत आहेत. शाळेच्या या बदललेल्या रूपाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
फोटो :
दुशेरे ता. कऱ्हाड येथील जिल्हा परिषद शाळेच्या भिंती रंगविल्यामुळे सेल्फी पाॅईंट बनल्या आहेत.