‘झेडपी’तील बंडोबा जाहले थंडोबा!

By admin | Published: February 10, 2016 11:45 PM2016-02-10T23:45:24+5:302016-02-11T00:31:26+5:30

रामराजेंकडून झाडाझडती : भर बैठकीत संबंधित सदस्यांची सपशेल शरणागती

Zimbabwe junky zombie in ZP! | ‘झेडपी’तील बंडोबा जाहले थंडोबा!

‘झेडपी’तील बंडोबा जाहले थंडोबा!

Next

सातारा : ‘पक्षात शिस्त हीच महत्त्वाची गोष्ट असून, भविष्यात अशा चुका होऊ नयेत, याची प्रत्येकाने खबरदारी घ्यावी,’ अशी सक्त सूचना विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी जिल्हा परिषद बंडखोरांच्या बैठकीत दिली. यावेळी पक्षप्रतोद बाळासाहेब भिलारे आणि अमित कदम यांच्यासह संबंधितांनीही दिलगिरी व्यक्त केली. दरम्यान, पदाधिकारी बदलाबाबतचा निर्णय कोणत्याही परिस्थितीत येत्या दोन दिवसांत घेण्याचा शब्दही नेत्यांनी यावेळी दिला.
जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या २५ सदस्यांनी बंडाचा पवित्रा घेतल्यानंतर राष्ट्रवादीच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली होती. या पार्श्वभूमीवर विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर आणि आमदार शशिकांत शिंदे यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष माणिकराव सोनवलर यांच्या शासकीय निवासस्थानी बुधवारी दुपारी तातडीची बैठक घेऊन बंड करणाऱ्या सदस्यांची झाडाझडती घेतली.
दुपारी दोनला सुरू होणारी बैठक साडेतीनला सुरू झाली. एक-एक सदस्य शासकीय निवासस्थानात जात होते. त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे तणाव जाणवत होता. रामराजे नाईक-निंबाळकर, आमदार शशिकांत शिंदे, माजी खासदार लक्ष्मणराव पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष माणिकराव सोनवलकर यांच्यासह काही मोजकेच पदाधिकारी एका खोलीत चर्चा करत होते. तर दुसऱ्या खोलीत जिल्हा परिषदेचे सदस्य आणि महिला सदस्यांना बसविण्यात आले होते.
सुमारे तासभर चर्चा झाल्यानंतर सर्व सदस्य शासकीय निवासस्थानातून बाहेर पडले. बैठकीपूर्वी जो तणाव सदस्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता, तो बैठक संपल्यानंतर काहीसा हलका झाला होता. काही सदस्य हसत, गप्पा मारत बाहेर येत होते. ‘बैठकीत काय चर्चा झाली?,’ असे पत्रकारांनी काही सदस्यांना विचारले. मात्र ‘काही नाही, रामराजे बोलतील,’ अशी उडवाउडवीची उत्तरे देऊन सदस्यांनी काढता पाय घेतला.
रामराजे नाईक-निंबाळकर आणि लक्ष्मणराव पाटील ज्या खोलीत बसले होते, त्या खोलीत जाऊन पत्रकारांनी रामराजेंनाही बैठकीसंदर्भात विचारले. यावर रामराजे म्हणाले, ‘पक्षांतर्गत काय घडामोडी असतात, त्यावर काय बोलणार? नो कमेंट,’ असं सांगून त्यांनीही बैठकीत झालेल्या घडामोडीवर भाष्य करणे टाळले.
राष्ट्रवादीच्या २५ सदस्यांनी बंडाचा पवित्रा घेतल्याचे वृत्त फक्त ‘लोकमत’मध्ये मंगळवारी प्रसिद्ध झाले होते. राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात पहिल्यांदाच उघडउघड बंड झाल्याने वरिष्ठ पातळीवरून याची गंभीर दखल घेतली गेली. राजीनामा कोणाचा घ्यायचा, कधी घ्यायचा या निर्णयापेक्षा पक्ष शिस्त महत्त्वाची असल्याने बुधवारी सदस्यांची तातडीने बैठक बोलविण्यात आली होती. (प्रतिनिधी)





उदयनराजे समर्थकांची पाठ...
या बैठकीला जिल्हा परिषदेतील बहुतांश बंडखोर सदस्य हजर होते. मात्र, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रवी साळुंखे यांच्यासह खासदार उदयनराजेंचे समर्थक या बैठकीकडे फिरकलेही नाहीत. त्यांच्या अनुपस्थितीविषयीही सदस्यांमध्ये चर्चा सुरू होती. त्यांच्या राजीनाम्याविषयी शशिकांत शिंदे आणि सुनील माने यांनी खासदार उदयनराजेंशी चर्चा करावी, असा निर्णय या बैठकीत झाला.

Web Title: Zimbabwe junky zombie in ZP!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.