कच्च्या रस्त्यापायी ‘खासदार विरुद्ध झेडपी’
By admin | Published: July 5, 2014 12:18 AM2014-07-05T00:18:42+5:302014-07-05T00:19:06+5:30
प्रतापसिंह शेती केंद्र : उदयनराजेंनी सुरू केलेला रस्ता ‘सीईओें’कडून तत्काळ बंद
सातारा : जिल्हा परिषदेच्या येथील प्रतापसिंह शेती फार्ममधून नव्याने काढण्यात आलेला रस्ता जिल्हा परिषदेतर्फे दगड ठेवून अडविण्यात आला होता. हा रस्ता खासदार उदयनराजे भोसले यांनी बुधवारी दुपारी खुला केला. मात्र, जिल्हा परिषदेतर्फे शुक्रवारी दगड लावून पुन्हा हा रस्ता बंद केल्याने एवढ्याशा रस्त्यासाठी ‘खासदार विरुध्द झेडपी’ अशी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे.
येथील राधिका रस्त्यालगत जिल्हा परिषदेचा छ. प्रतापसिंह महाराज हे शेती केंद्र आहे. या शेतीमधून राधिका रस्ता ते नकाशपुरा पेठेत जाणारा रस्ता तयार करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेतर्फे या ठिकाणी ‘हा रस्ता रहदारीसाठी नाही,’ असा फलक लावण्यात आला होता. रस्त्यावर दगड मांडून तो बंद करण्यात आला होता. मात्र, खासदार उदयनराजे भोसले यांनी कार्यकर्त्यांसोबत येऊन हा बंद रस्ता खुला केला होता. दोन दिवसानंतर शुक्रवारी पुन्हा ‘हा रस्ता रहदारीसाठी नाही,’ असा फलक याठिकाणी झळकला. रस्त्यावर दगड लावण्यात आले होते. या ठिकाणी पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला. दुपारी दीडपर्यंत या रस्त्यावर पोलीस बंदोबस्त होता. दुपारनंतर येथून पोलीस निघून गेल्यानंतर हा रस्ता पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.
एका बिल्डरने शेती फार्मलगत गृहप्रकल्पाचे काम सुरू केल्यामुळे त्याच्या फायद्यासाठी हा रस्ता केला गेला असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. जिल्हा परिषदेचे सदस्य दीपक पवार यांनीही हा रस्ता बंद करण्याची जोरदार मागणी केली होती. आता पुन्हा एकदा हा रस्ता वादात सापडला आहे. रस्त्यालगत पुलाचे बांधकाम सुरू असतानाही काही दिवसांपूर्वी वाद पेटला आणि राजकारण सुरू झाले. (प्रतिनिधी)