नेत्यांच्या संघर्षात झेडपी लटकली!
By admin | Published: January 23, 2016 11:56 PM2016-01-23T23:56:23+5:302016-01-23T23:56:23+5:30
राष्ट्रवादीतील बंडखोरी : कारवाईबाबत ‘टू बी आॅर नॉट टू बी.. दॅट इज द क्वेशन?’
सागर गुजर ल्ल सातारा
विधानपरिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर अन् खासदार उदयनराजे भोसले यांच्या भोवतीच जिल्हा परिषदेचे राजकारण पिंगा घालत असल्याचे चित्र पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. दरम्यान, या नेत्यांच्या राजकीय संघर्षात पदाधिकाऱ्यांच्या बंडखोरीबाबतचा निर्णय अजूनही लटकला आहे.
बालेकिल्ल्यातच राष्ट्रवादीला पदाधिकाऱ्यांचे धक्के बसले आहेत. राष्ट्रवादीचे कोरेगाव तालुकाध्यक्ष किशोर बाचल सोडून गेले, माजी शिक्षण सभापती अॅड. भास्करराव गुंडगे काँगे्रसचे आमदार जयकुमार गोरे यांच्या पंक्तीत जाऊन बसले, तर ज्यांना पक्षाने जिल्हा परिषदेत महत्त्वाची पदे दिली, तीच मंडळी नेत्यांच्या आदेशाला डावलत राजीनामा देण्यास नकार देत आहेत. याउलट पक्ष सोडून जाण्याचा इशाराही देत आहे, त्यामुळे ‘हाय नजर कुणाची लागली ‘राष्ट्रवादी’ वैभवा, अशी म्हणण्याची वेळ आली आहे.
सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादी हा सर्वात मोठा पक्ष आहे. जिल्ह्याचे मिनी मंत्रालय संबोधल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचे प्राबल्य आहे. जिल्ह्यातल्या मोजक्या पंचायत समिती वगळता बहुतांश ठिकाणी राष्ट्रवादीचे निर्विवाद वर्चस्व आहे. जिल्ह्याची अर्थवाहिनी जिल्हा मध्यवर्ती बँकेत राष्ट्रवादीचे पाशवी बहुमत आहे. गावोगावच्या विकास सेवा सोसायट्या, जिल्हा खरेदी-विक्री संघ, बाजार समित्या, मजूर फेडरेशन या सर्व सहकारी संस्थांमध्ये राष्ट्रवादीने विणलेल्या जाळ्याच्या जोरावर सत्ता अबाधित आहे.
एवढे मोठे वैभव राष्ट्रवादीकडे आहे. राज्यात सत्ता गमावली असली तरी सातारा जिल्ह्यात आपलेच राज्य, या थाटात राष्ट्रवादीचे नेते मंडळी वावरत असतात; राष्ट्रवादीने ज्यांना मोठे केले, सन्मानाची पदे दिली, तीच प्यादी मंडळी राष्ट्रवादीच्या नेतेमंडळींवर गुरगुरत आहेत.
जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांना राजीनामा सादर करण्याच्या सूचना दस्तुरखुद्द अजित पवार यांनी केल्या होत्या. विधानपरिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, माजी मंत्री शशिकांत शिंदे यांचे आदेश होऊनही जिल्हा परिषदेतील पदाधिकारी पदाला चिकटून बसले आहेत. मार्च महिन्याअखेरपर्यंत जिल्हा परिषदेची ‘गुळाची ढेप’ सोडायची नाही, असा त्यांचा होरा आहे. कोऱ्या कागदावर सह्या घेऊन आता त्यावर राजीनाम्याचा मजकूर लिहिला गेला असल्याचा आरोप ही मंडळी करत असल्याने राष्ट्रवादीतील बेबनाव उघडकीस आलेला आहे. खासदार उदयनराजे भोसले व विधानपरिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या भोवतीच जिल्हा परिषदेचे राजकारण पिंगा घालत असल्याचे चित्र अनेकदा पुढे आले आहे.
राष्ट्रवादी महिला पदाधिकाऱ्यांमध्ये झालेल्या वादावादीनंतर दोन महिला पदाधिकाऱ्यांचे पक्षाने निलंबन केले. राष्ट्रवादीचे कोरेगाव तालुका प्रमुख असताना किशोर बाचल, अॅड. भास्करराव गुंडगे आ. गोरे यांच्या मांडीला मांडी लावून बसले. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रवी साळुंखे, सभापती अमित कदम, कविता मोरे, शिवाजीराव शिंदे, मानसिंगराव माळवे यांनी पदाच्या राजीनाम्यासोबत राष्ट्रवादी सदस्यत्वाचा राजीनामा देण्याचा इशारा दिला आहे. तरी बरे शिवसेना-भाजप या दोन पक्षांकडे राज्याची सत्ता असूनही जिल्ह्यात दोन्ही पक्षांची अवकळा कायम आहे.
बंडाला गोरेंच्या उपोषणाचा मुहूर्त
जिल्हा बँकेविरोधात आ. जयकुमार गोरे यांनी ज्या दिवशी उपोषण सुरू केले, त्याच दिवशी जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामा घ्यायचा असेल तर पक्षाच्या सदस्य पदाचा राजीनामाच देतो, असा दम एका लेखी पत्राद्वारे नेत्यांना भरला.
सुरेंद्र गुदगे लवकरच राष्ट्रवादीत..
माजी आमदार भाऊसाहेब गुदगे यांची हयात काँगे्रससोबत गेली. मायणी या त्यांच्या मूळगावी गुदगेंचे वर्चस्व आहे. त्यांचे चिरंजीव माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुदगे हे आता लवकरच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. ही तेवढी राष्ट्रवादीसाठी जमेची बाजू ठरली आहे.