झेडपी पदाधिकाऱ्यांचे आज राजीनामे
By admin | Published: January 13, 2016 12:16 AM2016-01-13T00:16:15+5:302016-01-13T01:10:08+5:30
निर्णय झाला : वरिष्ठ नेत्यांच्या आदेशानंतर हालचालींना वेग
सातारा : जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्याला अखेर मुहूर्त सापडला आहे. सर्व पदाधिकारी बुधवारी जिल्हाध्यक्ष सुनील माने यांच्याकडे आपले राजीनामे सादर करतील, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली.
जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्याचा विषय अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. ग्रामपंचायत निवडणुकीआधी पक्षाचे नेते अजित पवार यांनी फलटण येथे झालेल्या पक्षाच्या बैठकीत जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांनी जिल्हाध्यक्ष सुनील माने यांच्याकडे राजीनामे देण्याची सूचना केली होती. परंतु ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा आधार घेत पदाधिकाऱ्यांनी पदांना मुदतवाढ मिळविली.
ग्रामपंचायत निवडणुकीनंतर हे राजीनामे देणे क्रमप्राप्त होते; परंतु पदाधिकाऱ्यांनी ‘पहले तुम’ असे म्हणत राजीनामे देण्याची टाळाटाळ केली.
दरम्यान, जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांच्या खांदेपालटासंदर्भात जिल्हा परिषद अध्यक्षांच्या निवासस्थानी सोमवारी बैठक झाली होती. या बैठकीकडे उपाध्यक्ष रवी साळुंखे यांच्यासह सभापतींनी पाठ फिरविली होती. त्यामुळे ही बैठक कोणत्याही निर्णयाविना आटोपती घ्यावी लागली होती.
एकमेकांच्या पायात पाय अडकवून पदांच्या रक्षणासाठी सुरू असलेले हे प्रयत्न वरिष्ठांच्या सूचनेमुळे फोल ठरले आहेत.
रहिमतपूर दौऱ्यावर असणाऱ्या अजित पवारांनी पुन्हा एकदा याबाबत जिल्ह्यातील नेत्यांकडे याबाबत विचारणा केली. त्यामुळे मंगळवारी राजीनाम्यांच्या अनुषंगाने वेगाने चक्रे फिरली.
बुधवारी सर्व पदाधिकारी पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांच्याकडे राजीनामे सादर करतील, अशी शक्यता आहे.
जिल्हा परिषदेचे पदाधिकारी पक्षांतर्गत राजीनाम्यांची कार्यवाही पूर्ण करतील. त्यानंतर सर्व उपाध्यक्ष रवी साळुंखे व सभापती अमित कदम, शिवाजीराव शिंदे, मानसिंगराव माळवे, कल्पना मोरे हे अध्यक्ष माणिकराव सोनवलकर यांच्याकडे राजीनामा सादर करतील. यानंतर अध्यक्ष सोनवलकर विभागीय आयुक्त चोकलिंगम यांच्याकडे राजीनामा सादर करतील.
गेल्या सभापतीपदाच्या निवडीच्या वेळीही अनेक इच्छुकांची नावे पुढे आले होते. मात्र, निवडणूक काही महिन्यांवर आली असल्याने विधानसभा निवडणूक अडचणी येऊ नयेत, हा दृष्टीकोन डोळ्यासमोर त्यावेळीही वरिष्ठांनी बेरजेचे गणित करत ऐनवेळी निर्णय घेऊन विद्यमान पदाधिकाऱ्यांच्या निवडी केल्या होत्या. आता काय होणार याकडे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)
अध्यक्षपदासाठी सुभाष नरळे प्रबळ दावेदार
जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी सुभाष नरळे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. माण तालुक्यातील राष्ट्रवादीला गतवैभव प्राप्त करण्याच्या अनुषंगाने राष्ट्रवादी माण तालुक्याला अध्यक्षपद बहाल करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.