झेडपी अध्यक्षांनी घेतला विद्यार्थ्यांचा तास
By admin | Published: January 10, 2016 10:57 PM2016-01-10T22:57:20+5:302016-01-11T00:48:42+5:30
अहिरे प्राथमिक शाळा : मुलांची बौद्धिक पातळी पाहून शिक्षकांच्या कामाचे कौतुक
खंडाळा : स्वच्छ व सुंदर परिसर, विविध रंगांच्या फुलांनी बहरलेली बाग, शालेय आनंददायी वातावरण, चुनचुनीत मुले अशी सर्वांग सुंदर शाळा पाहून जिल्हा परिषद अध्यक्ष माणिकराव सोनवलकर यांना विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याचा मोह आवरता आला नाही. त्यांनी पहिली ते चौथीच्या वर्गावर जाऊन
विद्यार्थ्यांचा तास घेतला. शाळेती विद्यार्थ्यांची बौद्धिक पातळी पाहून शिक्षकांच्या कामकाजाबाबत कौतुक केले.
अहिरे येथील प्राथमिक शाळेला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष माणिकराव सोनवलकर यांनी अचानक भेट दिली. सोबत सभापती रमेश धायुगडे-पाटील, सरपंच सुरेखा धायगुडे, अॅड. सचिन धायगुडे होते.
अध्यक्षांनी सर्वप्रथम पहिली ते चौथीच्या वर्गात जाऊन विविध विषयांस अनुसरून तपासणी केली. विद्यार्थ्यांचे भाषिक कौशल्य, गणितीक्रिया, इंग्रजी वाचन, कला-कार्यानुभवाची प्रात्यक्षिके पाहिले. तब्बल तीन तास विद्यार्थ्यांशी हितगुज केले.
सोनवलकर यांनी शाळेची पाहणी करुन विद्यार्थ्यांशी चर्चा केली. यावेळी विद्यार्थ्यांनी त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. अचानक भेट देऊनही शाळा आणि विद्यार्थ्यांची तयार पाहून जिल्हा परिषद अध्यक्ष माणिकराव सोनवलकर यांनी समाधान व्यक्त केले.
अहिरे शाळेने परिसरात बागेची निर्मिती करून विविध प्रकारच्या फुलझाडांची लागवड केली आहे. मुलांसाठी खेळाचे प्रशस्त मैदान, मनोरंजक खेळणीची उभारणी यांचीही पाहणी केली. शाळेच्या आयएसओ मानांकनासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन जिल्हा परिषद अध्यक्ष माणिकराव सोनवलकर यांनी शाळा व्यवस्थापनाला दिले. त्यामुळे शिक्षकांनी समाधान व्यक्त केलेल. (प्रतिनिधी)
अहिरे शाळेचा कायापालट करण्याचे काम गतीने सुरू आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी शिक्षकांचे कायम प्रयत्न असतात. शाळेचे अनेक उपक्रम हाती घेऊन सर्वांगीण शिक्षण देण्यात येते. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांनी भेट घेऊन कौतुक केले. यामुळे आम्हाला प्रोत्साहन मिळाले आहे. यापूर्वी मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन पाटील यांनीही भेट देऊन पाहणी केली होती. जिल्हा परिषदेचे अधिकारी, पदाधिकारी लक्ष देत असल्याने विद्यार्थ्यांचा उत्साह वाढ आहे.
- प्रशांत गंधाले,
मुख्याध्यापक,
अहिरे प्राथमिक शाळा