झेडपीचे मिशन आता दहा हजार कुटुंबांना घर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2018 11:50 PM2018-10-03T23:50:19+5:302018-10-03T23:50:24+5:30
सातारा : ‘ग्रामीण स्वच्छ सर्वेक्षणामध्ये देशात पहिला क्रमांक सातारा जिल्ह्याने पटकाविल्यानंतर आता दिवाळीपूर्वी दहा हजार कुटुंबांना हक्काचं घर देण्याचे मिशन हाती घेतले आहे,’ अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
डॉ. कैलास शिंदे म्हणाले, ‘ आपल्या सातारा जिल्ह्यास जसा क्रांतीचा वारसा लाभला आहे. तसाच उत्तम प्रशासनाचा ग्रामविकासाच्या प्रत्येक संकल्पना या मातीत रुजल्या. बहरल्या व साकारल्या आहेत.
संपूर्ण देशाला पथदर्शी ठरवणारे अनेक यशस्वी प्रयोग साताऱ्यात झाले. केंद्र शासन आणि राज्य शासनाने जाहीर केलेल्या अनेक कार्यक्रमांची आपल्या जिल्ह्याने यशस्वी अंमलबजावणी करून देशासमोर आदर्श निर्माण केला आहे.
केंद्र शासनाने स्वच्छ सर्वेक्षण २०१८ मध्ये संपूर्ण देशातील ७१८ जिल्ह्याचे स्वच्छता सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये सातारा जिल्ह्यातील १६ गावांची केंद्रीय समितीमार्फत तपासणी करण्यात आली.
हा गौरव स्वच्छतेसाठी अहोरात्र झटणाºया सर्वांचा आहे. एकूण १०० गुणांकनामध्ये सातारा जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत मिशनच्या कार्यामुळे ३५ गुण प्राप्त झाले. तसेच नागरिकांकडून मोबाईल अभिप्रायासाठीचे पाच गुण प्राप्त झाले आहेत.
शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, बाजारस्थळे, धार्मिक ठिकाणांची व सार्वजनिक जागेतील स्वच्छतेच्या निरीक्षणासाठीच्या ३० गुणांपैकी २९.४४ इतके गुण प्राप्त झाले. जिल्ह्यात स्वच्छतेविषयक सुविधा व सातत्य निर्माण केल्याने सर्व जिल्ह्यात सर्वोच्च गुण म्हणजे ९७.९० टक्के इतके गुण प्राप्त झाल्याने देशातील पहिला जिल्हा म्हणून सातारा जिल्ह्याची निवड झाली.
आता आणखी जबाबदारी वाढली असून, नागरिकांना हक्काचं घरकुल देण्याचं मिशन हाती घेतले आहे. ९०७ कुटुंबांना जमीन नाही. या लोकांना शासकीय जमीन देऊन घरे बांधण्याचे उद्दिष्ट्य पूर्ण केले जाणार आहे.
सध्या ७ हजार ३४९ घरे पूर्ण झाली आहेत. केवळ अडीच हजार घरे बांधणे बाकी आहे. ही सर्व घरे दिवाळीपूर्वी बांधून पूर्ण करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. त्यानंतर दहा हजार घरांचे उद्दिष्ट्य पूर्ण
होणार आहे. त्यामुळे अनेकांना दिवाळीपूर्वी हक्काच घर मिळणार आहे.
पेट्रोलपंप चालकांना नोटीस देणार..
प्रत्येक पेट्रोल पंपावर शौचालय आणि इतर स्वच्छतेबाबत सुविधा नसतील त्या पेट्रोलपंप मालकांना कायदेशीर नोटिसा पाठविण्यात येणार आहेत. तसेच हॉटेल मालकांनाही स्वच्छतेबाबत तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.