लग्नानंतर शारीरिक संबंधाबाबत काय विचार करतात भारतीय पुरूष? रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2022 11:21 AM2022-05-11T11:21:11+5:302022-05-11T11:22:51+5:30
Family health Survey : २०१९-२०२१ मध्ये करण्यात आलेल्या सर्व्हेत विचारण्यात आलेल्या एका प्रश्नावर ८० टक्के महिला आणि ६६ टक्के पुरूषांनी सांगितलं की, पत्नीने पतीला शारीरिक संबंधासाठी नकार (Sex Life) देण्यात काही चुकीचं नाही.
Family health Survey : मॅरिटल रेपची (Marrital Rape) चर्चा होत असताना म्हणजे पतीने जबरदस्ती पत्नीसोबत संबंध ठेवण्याच्या विषयाची चर्चा होत असताना नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे-५ चा भारतीयांच्या बेडरूम लाइफवर एक महत्वाचा रिपोर्ट समोर आला आहे. २०१९-२०२१ मध्ये करण्यात आलेल्या सर्व्हेत विचारण्यात आलेल्या एका प्रश्नावर ८० टक्के महिला आणि ६६ टक्के पुरूषांनी सांगितलं की, पत्नीने पतीला शारीरिक संबंधासाठी नकार (Sex Life) देण्यात काही चुकीचं नाही.
या सर्व्हेमध्ये शारीरिक संबंधाला नकार देण्याची तीन कारणे दिली गेली होती. पहिलं जर पतीला कोणत्या प्रकारचा लैंगिक विकार असेल, जर पतीने दुसऱ्या महिलेसोबत संबंध ठेवले असतील किंवा पत्नी थकलेली असेल किंवा तिचा मूड नसेल. सर्व्हेमध्ये सहभागी ८ टक्के महिला आणि १० टक्के पुरूषांना वाटतं की, यातील कोणत्याही कारणाने पत्नी शारीरिक संबंधासाठी नाही म्हणू शकत नाही.
या रिपोर्टमधून समोर आलं की, देशातील ८२ टक्के महिलांचं मत आहे की, त्या त्यांच्या पतीला शारीरिक संबंधासाठी नकार देऊ शकतात. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मंडाविया यांनी गेल्या आठवड्यात हा रिपोर्ट रिलीज केला.
या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, पाचमधील चारपेक्षा जास्त (८२ टक्के) महिला आपल्या पतीला शारीरिक संबंधासाठी नकार देतात. पतीला शारीरिक संबंधासाठी नाही म्हणणाऱ्या महिलांची सर्वाधिक संख्या गोव्यामध्ये (९२ टक्के) आहे. तर अरूणाचल प्रदेशमध्ये (६३ टक्के) आणि जम्मू-काश्मीरमध्ये(६५ टक्के) ही संख्या सर्वात कमी आहे.
जेंडर अॅटिट्यूडची माहिती मिळवण्यासाठी या सर्व्हेमध्ये पुरूषांना इतरही काही प्रश्न विचारण्यात आले. हे प्रश्न त्या परिस्थितींशी निगडीत होते जेव्हा पत्नी आपल्या पतीची इच्छा असूनही शारीरिक संबंधासाठी नकार देतात.
पुरूषांना विचारण्यात आलं होतं की, पत्नीने संबंध ठेवण्यास नकार दिल्यावरही ते चार पद्धतीने वागतात का? जसे की, राग व्यक्त करणे, पत्नीला काहीबाही बोलणे, पत्नीला घर खर्चासाठी पैसे न देणे, मारहाण करणे, पत्नीची इच्छा नसताना जबरदस्ती संबंध ठेवणे किंवा दुसऱ्या महिलेसोबत संबंध ठेवणे यांचा समावेश आहे.
सर्व्हेत १५-४९ वयोगटातील केवळ सहा टक्के लोकांचं मत आहे की, जर पत्नी शारीरिक संबंधाला नकार देत असेल त्यांच्याकडे या चारही पद्धतीने वागण्याचा अधिकार आहे. सर्व्हेतील ७२ टक्के पुरूषांनी या चारपैकी कोणताही पर्याय निवडला नाही. १९ टक्के पुरूषांचं मत आहे की, पत्नीने संबंधाला नकार दिल्यावर पत्नीवर रागावण्याचा किंवा तिला ओरडण्याचा त्यांना अधिकार आहे.
सर्व्हे सांगतो की, जवळपास सर्वच राज्यात या चार पर्यायांपैकी एकाशीही सहमत नसणाऱ्या पुरूषांची संख्या ७० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. तर पंजाबमध्ये २१ टक्के, चंडीगढमध्ये २८ टक्के, कर्नाटकमध्ये ४५ टक्के आणि लडाखमध्ये ४६ टक्के पुरूषांनी यातील कोणत्याही पर्यायाशी सहमत नसणाऱ्या पुरूषांची टक्केवारी ५० टक्क्यांपेक्षा कमी आहे.
तसेच या सर्व्हेतून समोर आलं की, विवाहित महिलांमध्ये रोजगाराचा दर ३२ टक्के आहे. तर याआधीच्या सर्व्हेमध्ये हा दर ३१ टक्के होता. या ३२ टक्के महिलांपैकी १५ टक्के महिलांना त्यांचा पगारही मिळत नाही आणि यातील १४ टक्के महिला हेही विचारू शकत नाहीत की, त्यांचे पैसे कशात खर्च झाले.