जीवाशी खेळू नका! लैंगिक क्षमता वाढविणाऱ्या गोळ्या खाण्यापूर्वी सावधान

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2022 08:51 AM2022-07-06T08:51:23+5:302022-07-06T08:51:47+5:30

अतिरिक्त सेवनाने दुष्परिणामांचा करावा लागतो सामना

Be careful before taking sexual enhancement pills | जीवाशी खेळू नका! लैंगिक क्षमता वाढविणाऱ्या गोळ्या खाण्यापूर्वी सावधान

जीवाशी खेळू नका! लैंगिक क्षमता वाढविणाऱ्या गोळ्या खाण्यापूर्वी सावधान

googlenewsNext

संतोष आंधळे

मुंबई : लैंगिक क्षमता वाढविण्यासाठी विविध औषधे घेण्याकडे पुरुषांचा कल असतो. मात्र या औषधांचे सेवन मोठ्या प्रमाणात केल्याने अनेक पुरुषांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. अशाच गोळ्यांच्या अतिरिक्त सेवनामुळे रविवारी नागपुरात एका युवकाचा मृत्यू झाला होता, तर उत्तर प्रदेशात याच कारणामुळे एका युवकाला रुग्णालयात दाखल करून त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यामुळे अतिशय सहजपणे मिळणाऱ्या या कामोत्तेजक गोळ्या घेताना डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे असून, विनासल्ला अशा गोळ्यांच्या सेवनाने गंभीर परिणामांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे तीन महिन्यांपूर्वीच लग्न झालेल्या युवकाला लैंगिक क्षमता वाढविणाऱ्या औषधाचा अतिरेक करणे चांगलेच महागात पडले होते. त्यातून उद्भवलेल्या व्याधीच्या उपचाराचा भाग म्हणून डॉक्टरांना त्या रुग्णाच्या लिंगावर शस्त्रक्रिया करावी लागली होती. या युवकाने मित्राच्या सल्ल्याने लैंगिक क्षमता वाढविण्याच्या गोळ्या घेण्यास सुरुवात केली आणि त्याचा अतिरेक झाल्याने त्याला थेट रुग्णालयात दाखल करावे लागले होते. दुसऱ्या एका घटनेत, रविवारी नागपूर येथे एका युवकाचा शारीरिक संबंध करतानाच मृत्यू झाला. संबंध प्रस्थापित करण्यापूर्वी त्याने लैंगिक क्षमता वाढविण्याच्या गोळ्या घेतल्याचे त्याच्या प्रेयसीने पोलिसांना सांगितले.

या औषधांबाबत जसलोक रुग्णालयातील मूत्र शल्यचिकित्सक आणि लैंगिक तज्ज्ञ डॉ. संतोष गवळी यांनी सांगितले की, हे औषध सरसकट सर्वांसाठी नसून, ज्यांना लैंगिक समस्या भेडसावत असतील, त्यांनीच वैद्यकीय सल्ल्यानेच अशी औषधे घ्यावीत. प्रत्येक व्यक्तीसाठी त्याच्या वजन, उंची आणि व्याधीची तीव्रता यानुसार औषधांचा डोस ठरलेला असतो. या गोळ्यांमध्ये सिल्डेनाफिल औषध असून लिंगामधील रक्तवाहिन्यांचा रक्तपुरवठा सुरळीत करण्यासाठी ते वापरले जाते. तथापि, या गोळ्यांचे अतिरिक्त सेवन केल्यास त्या व्यक्तीच्या शरीरावर त्याचे दुष्परिणाम होतात. त्यामुळे शासनाने हे औषध डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनेच मिळेल आणि सहजपणे उपलब्ध होणार नाही, अशी तरतूद करावी, असे मत डॉ. गवळी यांनी मांडले.

अतिरिक्त सेवनाने काय होतात त्रास?
या गोळ्यांच्या अतिरिक्त सेवनाने डोके आणि छातीत दुखणे, चक्कर येणे, हृदयाची धडधड वाढणे, चेहऱ्यावर सूज येणे, श्वसनासंबंधी समस्या उद्भविणे, डोळे लाल होणे अशा विविध समस्यांचा सामना करावा लागतो. तसेच, या गोळ्यांच्या अतिसेवनाने प्रिंपीसम हा आजरा होतो.

अतिसेवनाने प्रिंपीसम आजार
गेली ५२ वर्षे मी लैंगिक समस्या या विषयावर काम करत आहे. आजपर्यंत लैंगिक समस्या असलेले ५५,००० पेक्षा अधिक रुग्ण बघितले आहेत. त्यातील १५,००० पेक्षा अधिक व्यक्तींना लैंगिक समस्येच्या निवारणासाठी मी लोकांना लैंगिक क्षमता वाढण्यासाठीचे औषध लिहून दिले आहे. त्यांचा मी रीतसर पाठपुरावा घेत असतो. आजपर्यंत कुणाला फारसा त्रास झालेला नाही. काही छोटे दुष्परिणाम झाल्यास ते एक - दोन दिवसांत बरे होतात. परंतु, ज्या काही वाईट घटना घडल्या आहेत, त्यांच्यामागे लैंगिक क्षमता वाढविणाऱ्या गोळ्या हेच कारण आहे का, याचा खोलात जाऊन अभ्यास करण्याची गरज आहे. या गोळ्यांच्या अतिसेवनाने प्रिंपीसम हा आजार होतो, मात्र त्यावरही उपचार आहेत, असे डॉ. प्रकाश कोठारी म्हणाले.

Web Title: Be careful before taking sexual enhancement pills

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.