Coronavirus: शारीरिक संबंधामुळेही कोरोनाचा धोका; संशोधकांनी केला मोठा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2020 09:09 AM2020-05-10T09:09:48+5:302020-05-10T09:11:51+5:30
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले जात आहे.
कोरोनानं जगभरात हाहाकार माजवला असून, दिवसागणिक कोरोनाबाधितांची संख्या वाढतच चालली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत जगभरात 3,932,626 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 271,017 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्याचप्रमाणे 1,349,138 जणांनी कोरोनावर मात केली असल्याची माहिती देखील समोर आली आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले जात आहे. मात्र एका संशोधनानुसार शारीरिक संबंध ठेवल्यामुळे देखील कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
चीनमध्ये केलेल्या एका संशोधनानुसार, कोरोनाबाधित असलेल्या रुग्णाच्या वीर्यात देखील कोरोनाचा संसर्ग आढळला आहे. चीनमधील एका रुग्णालयाने 26 जानेवारी ते 16 फेब्रुवारी दरम्यान 38 कोरोनाबाधित रुग्णांच्या वीर्यीचे नमुने घेतले होते. यामध्ये काही कोरोनाबाधित रुग्णांची प्रकृती सुधारत होती. तर काहीजणांवर रुग्णालयात उपचार सुरु होते. यामधील दर सहापैकी एका रुग्णाच्या वीर्यात कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला असल्याचे संशोधकाच्या माध्यमातून समोर आले आहे.
चीनच्या या संशोधकानंतर वीर्यात व्हायरस आढळणे ही नवी बाब नसल्याचे काही रोग तज्ञांनी सांगितले. तसचे याआधी देखील जीका व्हायरसच्या वेळी काही रुग्णांच्या वीर्यात विषाणू आढळून आले होते, असं तज्ञांनी सांगितले. कोरोनाची लागण, कोरोनाची लक्षणं आणि कोरोना आजार बरा झाल्यानंतर शारीरिक संबंध टाळण्याचा इशारा देखील अनेक डॉक्टरांनी दिला आहे.