कंडोम एक्सपायर झाला की नाही हे कसं ओळखाल?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2019 03:56 PM2019-08-21T15:56:57+5:302019-08-21T16:00:27+5:30
यात काहीच दुमत नाही की, जगात सुरक्षित लैंगिक संबंधासाठी सर्वात सुरक्षित आणि सोपा उपाय कंडोम आहे.
यात काहीच दुमत नाही की, जगात सुरक्षित लैंगिक संबंधासाठी सर्वात सुरक्षित आणि सोपा उपाय कंडोम आहे. याचा वापर करणं सोपं तर आहेच, सोबतच कंडोम बाजारात सहजपणे उपलब्धही होतात. तसेच कंडोम तुम्ही सहजपणे पॉकेटमध्येही ठेवू शकता. कंडोमने नको असलेली गर्भधारणा तर रोखली जातेच, सोबतच वेगवेगळ्या लैंगिक आजारांपासूनही बचाव होतो.
शेप, साइज आणि फ्लेवरचे कंडोम
कंडोमची सर्वात चांगली बाब म्हणजे कंडोमच्या मदतीने तुम्ही पार्टनरसोबत कोणत्याही स्ट्रेस किंवा तणावाशिवाय शारीरिक संबंधाचा आनंद घेऊ शकता. तसेच कंडोम वेगवेगळ्या शेपमध्ये, फ्लेवरमध्ये आणि साइजमध्ये मिळतात त्यामुळे तुम्हाला तुमच्या पसंतीने निवड करता येते. मात्र, इतर गोष्टींप्रमाणेच कंडोमही एक्सपायर होतात. त्यामुळे याचा वापर करण्यापूर्वी तुम्हाला याच्या एक्सपायरीबाबत माहिती असली पाहिजे.
वेगळा दिसत असेल तर...
जर पॅकेटमधून काढल्यावर कंडोम फार जास्त ड्राय, चिकट किंवा फार रफ वाटत असेल तर तो कंडोम वापरण्याऐवजी तो फेकून द्या. कारण हे कंडोम एक्सपायर होण्याचे संकेत आहेत. असा कंडोम वापरणे तुम्हाला महागात पडू शकतं.
दुर्गंधी येत असेल तर...
जर पॅकेटमधून बाहेर काढल्यावर कंडोमचा रंग बदलल्यासारखा वाटत असेल किंवा मूळ रंगाचा दिसत नसेल तो कंडोम वापरू नका. तसेच त्यातून जर दुर्गंधी येत असेल तर हे कंडोम एक्सपायर होण्याची लक्षणे आहेत. असा कंडोम फेकून देणेच योग्य ठरेल.
एक्सपायरी डेट चेक करा
नेहमी एक्सपायरी डेट चेक करूनच कंडोमची खरेदी करा. कारण जसजशी एक्सपायरी डेट जवळ येऊ लागते, तेव्हा कंडोमची इलास्टिसीटी आणि त्याचा प्रभाव कमी होऊ लागतो. इतकेच नाही तर कंडोम व्यवस्थित दिसत असेल, पण एक्सपायरी डेट निघून गेली असेल तेव्हाही तो कंडोम वापरू नका. कारण असा कंडोम शारीरिक संबंधावेळी फाटण्याची शक्यता अधिक असते.
योग्य पद्धतीने हॅंडल करा
अनेकदा कंडोमचं पॅकेट उघडताना अनेकजण वेगवेगळ्या चुका करतात. जसे की, पॅकेट उघडण्यासाठी कात्रीचा वापर केला जातो. असं अजिबात करू नये. चुकून कात्रीने कंडोम फाटू शकतो. तसेच कंडोमचं पॅकेट दातांनीही फोडू नये. त्यासोबतच कंडोमच्या पॅकेटला नखांनी किंवा टोकदार कोणत्याही वस्तूने छिद्र पडू नये. या गोष्टींमुळे डॅमेज झालेला कंडोम वापरणे घातक ठरू शकतं.