'सेक्स टॉनिक' फायद्याचं की धोक्याचं?... जाहिरातींना भुलू नका!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2018 04:34 PM2018-10-23T16:34:25+5:302018-10-23T16:47:28+5:30
आपली शारीरिक संबंध ठेवण्याची क्षमता कमी झालीय, अशा तक्रारी अनेकदा ऐकायला मिळतात.
आपली शारीरिक संबंध ठेवण्याची क्षमता कमी झालीय, अशा तक्रारी अनेकदा ऐकायला मिळतात. हीच क्षमता वाढवण्यासाठी अनेक आयुर्वेदिक औषधे किंवा इतरही औषधांचा वापर केला जातो. पण ही औषधे खरंच परिणामकारक असतात का? किंवा त्यांचा खरंच फायदा होतो का? तसेच यांचे काही साईड इफेक्ट असतात का? असे एक ना अनेक प्रश्न तरुणांना पडत असतात.
या शंकांबद्दल तज्ज्ञ सांगतात की, 'लग्नानंतर शारीरिक संबंध हे दोघांच्या संमतीने झाले तरच त्याचा हवा तो आनंद घेता येतो. यात एकानेही इंटरेस्ट दाखवला नाही आणि तरीही शारीरिक संबंध प्रस्थापित केले गेले तर त्यातून आनंद मिळणं कठीण आहे. लैंगिक संबंध दोघांच्या संमतीने, दोघांच्या इच्छेने आले तरच ते सुखदायी असतात.
अनेकदा काही पुरुषांसोबत असं होतं की, त्यांची शारीरिक संबंध ठेवण्याची अजिबात इच्छा नसते. पण त्यांच्या पत्नीची असते. अशात इच्छा नसूनही शारीरिक संबंध ठेवले गेले तरी त्यातून दोघांनाही आनंद मिळत नाही. यावरून काहींना पत्नीकडून काही ऐकावही लागू शकतं. अशावेळी काही पुरुष हे ऐकावं लागू नये किंवा पत्नीची इच्छा पूर्ण केली नाही याचा न्यूनगंड येऊ नये म्हणून या औषधांचा मार्ग निवडतात.
डॉक्टर सांगतात की, जास्तीत जास्त पुरुषांमध्ये मुख्य लैंगिक समस्या या दोनच असतात. एक म्हणजे नपुंसकता आणि दुसरी शीघ्रपतन. यावर उपाय म्हणून जागोजागी लागलेल्या जाहिराती त्यांना आठवू लागतात. लैंगिक संबंधाविषयीची समस्या नेमकी समजून न घेता जाहिराती पाहून काही औषध घेणे हे फार घातक ठरू शकतं.
पण मुळात लैंगिक संबंधांमध्ये मानसिक तयारी ही फार महत्त्वाची असते. अनेकजण याकडे लक्ष देत नाहीत. याकडे लक्ष दिलं तर ही बाजारातील औषधे घेण्याची गरज पडणार नाही, असं डॉक्टर सांगतात. ते सांगतात की, आधी समस्या समजून घेऊन मग त्यावर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. अनेकदा औषधांची नव्हे तर आत्मविश्वास वाढवण्याची गरज असते. तो वाढवण्याचा एकमेव उपाय म्हणजे योग्य सेक्स एज्युकेशन. योग्य ज्ञान मिळताच आपल्यात कुठलेही वैगुण्य नाही, आपण नॉर्मल आहोत, हे त्यांच्या ध्यानात येतं आणि आत्मविश्वास येतो'.