स्वप्नदोष म्हणजे काय? 'हे' गैरसमज मनातून काढून टाका!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2018 04:36 PM2018-10-22T16:36:15+5:302018-10-22T17:11:00+5:30
तारुण्याच्या उंबरठ्यावर येताच तरुणांना आपल्या शरीरात वेगवेगळे बदल जाणवायला लागतात.
तारुण्याच्या उंबरठ्यावर येताच तरुणांना आपल्या शरीरात वेगवेगळे बदल जाणवायला लागतात. तारुण्यात आलेल्या जवळपास प्रत्येक तरुणाला येणारा अनुभव म्हणजे 'नाईट फॉल' किंवा याला 'स्वप्नदोष' असेही म्हटले जाते. तरुणाईमध्ये याबाबत अनेक गैरसमज दिसून येतात. काहींना वाटतं की, स्वप्नदोषातून बाहेर येणाऱ्या वीर्यामुळे शक्ती कमी होते. पण याला काहीही वैज्ञानिक आधार नसल्याचं तज्ज्ञ सांगतात.
मुळात ही एक नैसर्गिक प्रक्रिया असून यात गैर काहीच नाही. डॉक्टर सांगतात की, 'स्वप्नदोषामुळे वीर्य बाहेर येणं ही एक सामान्य प्रक्रिया आहे. वीर्य शरीरातून केवळ बाहेर टाकलं जावं म्हणूनच निर्माण होत असतं. निसर्गालाही तेच अभिप्रेत आहे. म्हणूनच हस्तमैथुनाची प्रेरणा, वयात येताच प्रत्येक व्यक्तीमध्ये नैसर्गिकरीत्या निर्माण होते.
कुणाला होते समस्या?
डॉक्टर सांगतात की, 'ज्यांचं लग्न झालेलं नाही किंवा जे हस्तमैथुन करत नाहीत, अशा पुरुषांमध्ये आपोआप झोपेत वीर्यस्खलन होण्याचा प्रकार घडतो. पण त्यात गैर किंवा अपायकारक काहीच नाही. असं घडावं हेच शरीराकडून अपेक्षित असतं'.
काय होते समस्या?
या प्रक्रियेला स्वप्नदोष असं म्हटलं जात असलं तरी काही तज्ज्ञ मानतात की, अशाप्रकारे वीर्य बाहेर येण्याला स्वप्नदोष हा फार चुकीचा शब्द आहे. कारण ही एक नैसर्गिक क्रिया आहे आणि यात दोष असा काही नाही. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे याचे शरीरावर कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. वीर्य शरीरातून केवळ बाहेर टाकलं जावं म्हणूनच निर्माण होत असतं. त्यामुळे काही उपचार घेण्याचीही गरज नाही.