जिल्ह्यात जलयुक्त शिवारची १ कोटीची कामे सुरू
By admin | Published: March 2, 2016 11:53 PM2016-03-02T23:53:07+5:302016-03-02T23:54:16+5:30
डायलिसीसच्या १६ मशिन्स : सिद्धिविनायक ट्रस्टकडून अनुदान, नरेंद्र राणे यांची माहिती
कणकवली : मुंबई येथील सिद्धिविनायक ट्रस्टच्या माध्यमातून सिंधुदुर्गातील जलयुक्त शिवार योजनेच्या कामांसाठी १ कोटी रूपये देण्यात आले होते. या कामांना सुरूवात झाली आहे. तसेच जिल्ह्यातील शासकीय रूग्णालयांना डायलिसीस यंत्रणा बसवण्यासाठी १ कोटी ५१ लाख ८४ हजार रूपये अनुदान देण्यात येणार असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष नरेंद्र राणे यांनी दिली.
येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत राणे यांनी ही माहिती दिली. यावेळी ट्रस्टचे सतीश पाडावे, जिल्हा कृषी अधीक्षक शेळके, तालुका कृषी अधिकारी व्ही.आर.राठोड, उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर आदी उपस्थित होते.
सिद्धिविनायक ट्रस्टकडून राज्यातील ३४ जिल्ह्यांना प्रत्येकी १ कोटी रूपयांचे अनुदान जलयुक्त शिवार योजनेसाठी देण्यात आले आहे. देवगड तालुक्यातील हडपीड गावात मातीनाला बंधारा, सिमेंट बंधारा, वळवणी बंधाऱ्यासाठी २० लाख रूपये, कणकवली तालुक्यातील ओझरम गावात बंधाऱ्यांसाठी २५ लाख रूपये, मालवण तालुक्यातील चिंदर गावात बंधाऱ्यांसाठी १४ लाख रूपये, कुडाळ तालुक्यातील शिवापूर गावात मातीनाला, सीसीटी, लूज बोल्डर स्ट्रक्चरसाठी २० लाख रूपये तर सावंतवाडी तालुक्यातील तांबोळी गावातील बंधाऱ्यांसाठी २० लाख रूपये असा आतापर्यंत ९९.९२ लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
या कामांची निविदा प्रक्रिया झाली असून कामांना सुरूवात झाली आहे. आणखी ६.५ कोटी या कामांसाठी देण्यात येणार आहेत. त्यापैकी सिंधुदुर्ग जिल्ह्याला १९ लाख ११ हजार रूपये मार्च महिन्यात मिळणार आहेत.
पूर्ण राज्यातील रूग्णालयांना डायलेसिस मशिन्स देण्यासाठी ७.५ कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. सिंधुदुर्गातील देवगड ग्रामीण रूग्णालय, मालवण ग्रामीण रूग्णालय आणि कणकवली उपजिल्हा रूग्णालयासाठी प्रत्येकी ४ डायलेसिस मशिन्स देण्यात येणार असून सावंतवाडी उपजिल्हा रूग्णालय व जिल्हा रूग्णालयासाठी प्रत्येकी २ मशिन्स देण्यात येणार आहेत. प्रत्येक मशिन ६ लाख २७ हजार रूपयांची असून ती बसवण्यासाठी प्रत्येकी ३ लाख २२ हजारांचा खर्च येणार आहे. असे एकूण १ कोटी ५१ लाख ८४ हजार रूपये यासाठी खर्च केले जाणार आहेत.
मात्र, ही यंत्रणा बसवण्यापूर्वी ती चालवणारे तंत्रज्ञ संबंधित रूग्णालयात उपलब्ध आहेत याची खात्री केल्यानंतरच यंत्रणा दिली जाईल, असे नरेंद्र राणे यांनी बोलताना स्पष्ट
केले. (प्रतिनिधी)
ट्रामा केअरसाठी प्रयत्न
कासार्डे येथे राज्यशासनाने ट्रॉमा केअर सेंटर मंजूर केले आहे. कासार्डे येथे शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. हे केंद्र अन्यत्र हलवून ती जागा ट्रॉमा केअरला दिल्यास ट्रस्ट ट्रॉमा केअर सेंटर उभारू शकते. त्यासाठी ५ कोटी रूपयांची तरतूद यापूर्वीच करण्यात आल्याची माहिती नरेंद्र राणे यांनी दिली.
३५ लाखांची पुस्तके वितरीत
सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात अकरावी ते पंधरावी या कक्षांची एकूण ३५ लाखांची पुस्तके ट्रस्टमार्फत देण्यात आली आहेत. सिंधुदुर्गातील खारेपाटण, तळेरे, कासार्डे, असरोंडी हायस्कूलला वितरीत करण्यात आल्याचे राणे यांनी यावेळी सांगितले.