मालवण मध्ये १ लाख २४ हजाराची गोवा बनावटीची दारू जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:34 PM2021-07-07T16:34:50+5:302021-07-07T16:36:05+5:30
liquor ban Sindhudurg : लॉकडाऊनचा फायदा उठवीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरु असलेल्या बेकायदेशीर गोवा बनावटीच्या दारू धंद्या विरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई करण्यास सुरुवात केली असून काल रात्री मालवण एसटी स्टँड मागील मुस्लिम मोहोल्ला येथे भरारी पथकाने टाकलेल्या धाडीत १ लाख २३ हजार ६०० रुपये किंमतीची गोवा बनावटीची दारू जप्त केली आहे.
मालवण : लॉकडाऊनचा फायदा उठवीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरु असलेल्या बेकायदेशीर गोवा बनावटीच्या दारू धंद्या विरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई करण्यास सुरुवात केली असून काल रात्री मालवण एसटी स्टँड मागील मुस्लिम मोहोल्ला येथे भरारी पथकाने टाकलेल्या धाडीत १ लाख २३ हजार ६०० रुपये किंमतीची गोवा बनावटीची दारू जप्त केली आहे.
गेले काही दिवस गोवा बनावटीच्या दारूच्या वाहतूक व विक्रीचा सुळसुळाट सुरू असतानाच या कारवाईमुळे संबंधितांचे धाबे दणाणले आहेत. मालवण एसटी बस स्टँडच्या मागील मुस्लिम मोहल्ला परिसरातील एका घरात रोहन रजनीकांत पेंडूरकर नावाच्या व्यक्तीकडून गोवा बनावटीच्या दारूचा साठा विक्रीच्या उद्देशाने लपवून ठेवल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळताच उत्पादन शुल्क विभागाचे जिल्हा अधीक्षक डॉ. बी.एच. तडवी यांच्या मार्गदर्शनाखालील भरारी पथकाने त्याठिकाणी अचानक धडक देत छापा टाकला.
या छाप्यात विविध ब्रँडच्या गोवा बनावटीच्या दारूचे १ लाख २३ हजार ६०० रुपये किंमतीचे एकूण १५ बॉक्स जप्त करण्यात आले. याप्रकरणी रोहन पेंडूरकर (वय ३२, रा. मुस्लिम मोहल्ला, वायरी मालवण) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक एस. के. दळवी, दुय्यम निरीक्षक डी. एम. वायदंडे, जवान आर. जी. ठाकूर, डी. आर. वायदंडे, आर. एस. शिंदे आदी सहभागी झाले होते. या प्रकरणी अधिक तपास निरीक्षक एस. के. दळवी हे करत आहेत.