सहाय्यता निधीसाठी ५ लाखांचा धनादेश : महाराष्ट्र कॅश्यू मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचा उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2020 05:18 PM2020-04-14T17:18:22+5:302020-04-14T17:19:15+5:30
वेंगुर्ला : देशावर आलेल्या कोरोना महामारीच्या संकटातून कोरोनाग्रस्त व गरिबांना मदत करण्यासाठी महाराष्ट्र कॅश्यू मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ...
वेंगुर्ला : देशावर आलेल्या कोरोना महामारीच्या संकटातून कोरोनाग्रस्त व गरिबांना मदत करण्यासाठी महाराष्ट्र कॅश्यू मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ५ लाख रुपयांचा धनादेश पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे देण्यात आला. पालकमंत्री यांनी हा धनादेश वेंगुर्ला तहसीलदार प्रवीण लोकरे यांच्याकडे सुपुर्द केला.
यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश बोवलेकर, सचिव बिपिन वरसकर, खजिनदार श्रीकृष्ण झांटये, दीपक ठाकूर, सुधीर झांटये आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र कॅश्यू मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन या संघटनेने नेहमीच विधायक कामासाठी आपला हातभार लावला आहे, अशी माहिती यावेळी अध्यक्ष सुरेश बोवलेकर यांनी दिली. तसेच कोरोनाचे संकट संपूर्ण जगावर आहे. या संकटातून मार्ग काढण्यासाठी प्रत्येकाने आपापल्यापरीने शासनाला पर्यायाने आपल्यालाच मदत करायला हवी.
केंद्र किंवा राज्य शासनाकडे भरघोस सहाय्यता निधी जमा झाला तर गोरगरीब आणि भुकेलेल्यांच्या पोटाची खळगी भरण्यासाठी मदत होणार आहे. त्यामुळे कॅश्यू असोसिएशनने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मदत देत एक आदर्श पायंडा घातला आहे, असेही बोवलेकर यांनी स्पष्ट केले.