ाोर्चात १ लाख बांधव सामील होणार
By admin | Published: October 18, 2016 12:34 AM2016-10-18T00:34:01+5:302016-10-18T00:51:04+5:30
आज जनजागृती रॅली : मराठा क्रांती मोर्चाबाबत सावंतवाडीचे नियोजन पूर्ण
सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यात मराठा क्रांती मोर्चाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. तालुक्यातून २३ आॅक्टोबरच्या क्रांती मोर्चात एक लाख मराठा बांधव सहभागी होणार आहेत. या मोर्चाच्या जनजागृतीसाठी मंगळवारी खास महारॅलीचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती सावंतवाडी नियोजनप्रमुख विक्रांत सावंत यांनी दिली. ते सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी शिवाजी सावंत, मनोज नाईक, संदीप सावंत, रूपेश राऊळ, आबा सावंत, प्रमोद गावडे, बबन गवस आदी उपस्थित होते.
विक्रांत सावंत म्हणाले, सावंतवाडी तालुक्यात मराठा मोर्चानिमित्त तीन कार्यालये उघडण्यात आली असून, ही कार्यालये सावंतवाडी, तळवडे व बांदा येथे उघडण्यात आली आहे. या कार्यालयांतून दशक्रोशीतील तसेच पंचक्रोशीतील व्यवस्था बघितली जाते. सावंतवाडीतील कार्यालय हे मुख्यकार्यालय असणार आहे. या ठिकाणी नियोजनाची तयारी पूर्ण केली जाईल, असे यावेळी त्यांनी स्पष्ट केले.
मराठा क्रांती मोर्चाला तालुक्यातून एक लाख मराठा बांधव जाणार असून, त्याचे नियोजनही पध्दतशीरपणे करण्यात आले आहे. हे नियोजन करीत असताना सर्वांना विश्वासात घेण्यात आले आहे. गावागावातील मराठा बांधव हे ओरोस येथे स्वत:हून जाणार आहेत. त्यासाठी गाड्यांची व्यवस्था करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मराठा मोर्चाला मुस्लिम व जैन बांधवांनी पाठिंबा दिला असल्याचे सावंत म्हणाले.
प्रत्येक गावात मोर्चास मोठा पाठिंबा मिळत आहे. लहान बालकांपासून ते आबालवृद्धांपर्यंत सर्वजण येण्यास उत्सुक आहेत. आम्हांला आरक्षण द्या, तसेच अॅट्रॉसिटी कायदा बंद करू नका. मात्र, त्यात थोडी शिथिलता आणा, असे आमचे अनेक मुद्दे घेऊन आम्ही मोर्चात उतरणार असल्याचेही यावेळी सावंत यांनी सांगितले. मराठा मोर्चाच्या जनजागृतीसाठी मंगळवारी सावंतवाडीत तालुक्याच्या महारॅलीचे आयोजन करण्यात आले असून, ही रॅली पूर्ण शहरातून जाईल. त्याची सुरूवात जिमखाना मैदानावरून, तर समाप्ती आरपीडी हायस्कूलच्या मैदानात होणार असल्याचे विक्रांत सावंत यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)