टर्मिनसच्या दुसऱ्या टप्प्यासाठी १० कोटी

By Admin | Published: June 20, 2016 12:19 AM2016-06-20T00:19:35+5:302016-06-20T00:19:35+5:30

सुरेश प्रभू : मडगाव येथे घोषणा; मळगावातील टर्मिनसच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन

10 crores for the second term of the terminus | टर्मिनसच्या दुसऱ्या टप्प्यासाठी १० कोटी

टर्मिनसच्या दुसऱ्या टप्प्यासाठी १० कोटी

googlenewsNext

तळवडे : रेल्वेचा झपाट्याने विकास होत असताना या विकास प्रक्रियेत कोकण रेल्वे मागे राहता कामा नये, यासाठी रेल्वे टर्मिनसच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. आता दुसऱ्या टप्प्याच्या कामासाठी १० कोटींची तरतूद करण्यात आली असल्याची घोषणा केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केली.
मंत्री सुरेश प्रभू यांनी विभागीय रेल्वे व्यवस्थापक शिबिर कार्यालय मडगाव-गोवा येथून सावंतवाडी टर्मिनसच्या पहिल्या टप्प्याचे व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून उद्घाटन केले. यावेळी केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर, खासदार नरेंद्र सावईकर उपस्थित होते, तर सावंतवाडी-मळगाव येथे कोकण रेल्वेचे संचालक राजेंद्रकुमार, भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, माजी आमदार राजन तेली, नगराध्यक्ष बबन साळगावकर, सभापती प्रमोद सावंत, मळगाव सरपंच गणेशप्रसाद पेडणेकर, निरवडे सरपंच उत्तम पांढरे, आदी उपस्थित होते.
यावेळी रेल्वेमंत्री प्रभू म्हणाले, कोकण रेल्वेचा झपाट्याने विकास झाला पाहिजे. गोवा हे विकासाचे मुख्य केंद्र आहे. त्याच्या बाजूच्या जिल्ह्यांचा विकास झाला पाहिजे. यासाठी आम्ही कंटेनरचा डेपो गोवा-बाळी येथे आणत आहोत. त्यातून रोजगारनिर्मिती होणार आहे. या कंटेनर डेपोचा फायदा आपला माल निर्यातीसाठी मोठ्या प्रमाणात होणार असून, यामुळे देवगडच्या आंब्याला चांगले दिवस आहेत. रेल्वेच्या माध्यमातून बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. आंब्याची निर्यात वेळेत होण्यास मदत होणार आहे, असे प्रभू म्हणाले.
कोकण रेल्वेला जोडणाऱ्या मळगाव येथील टर्मिनसच्या कामाचे भूमिपूजन एक वर्षापूर्वी झाले होते. मात्र, अधिकाऱ्यांनी चांगले काम करून दाखवत या टर्मिनसचे काम वेळेपूर्वी पूर्ण केले आहे. त्यामुळे कोकण रेल्वेचे सर्व अधिकारी कौतुकास पात्र असल्याचे मंत्री प्रभू म्हणाले. टर्मिनसच्या दुसऱ्या टप्प्याचे कामही लवकरच हाती घेण्यात येणार असून, त्यासाठी १० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्या कामाची निविदा प्रकिया तातडीने हाती घेण्यात येईल, असे प्रभू म्हणाले.
गोवा-मडगाव येथून दक्षिण गोव्याचे खासदार नरेंद्र सावईकर, केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर, रेल्वेचे वरिष्ठ संजय गुप्ता आदींनी आपले विचार मांडले. तर मळगाव येथे टर्मिनसच्या पहिल्या टप्प्याच्या कामाचा भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाला पंचायत समिती सदस्य प्रियंका गावडे, राघोजी सावंत, अशोक दळवी, श्वेता कोरगावकर, जिल्हा परिषद सदस्य निकिता जाधव, बांदा सरपंच मंदार कल्याणकर, प्रकाश परब, तालुकाध्यक्ष मनोज नाईक, मनोज कनवडेकर, पुखराज पुरोहित, कोकण रेल्वेचे अधिकारी बाळासाहेब निकम, आदी उपस्थित होते.
रेल हॉटेलला राज्य सरकारकडून मदतीचा हात
मळगाव येथे रेल्वे टर्मिनसबरोबरच रेल हॉटेल प्रकल्प उभारण्याचा संकल्प रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी सोडला होता. पण तीन वेळा निविदा काढूनही कोणी त्या निविदा न भरल्याने अखेर पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या पुढाकारातून राज्य सरकारचे पर्यटन विभाग हा प्रकल्प उभारणार आहे. तशी घोषणा पालकमंत्री केसरकर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केली.
व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने पाच कार्यक्रम
केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी विभागीय रेल्वे कार्यालयातून पाच कार्यक्रमांचे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे भूमिपूजन व उद्घाटन केले. यात गोव्यातील बाळी येथील कंटेनर कारखाना, बाळी येथे मल्टी मॉडेल लॉजिस्टिकचा शिलान्यास, टी.टी.ई.करिता हँड हेल्ड डिव्हाईस, सावंतवाडी टर्मिनसचे उद्घाटन व जामसंडे देवगड येथे मँगो पॅक हाऊसचा अपग्रेडेशन एवढे कार्यक्रम एकाच ठिकाणावरून आयोजित केले होते.

Web Title: 10 crores for the second term of the terminus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.