खारेपाटण येथे १0 लाखांचे बिबट्याचे कातडे जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2018 11:46 PM2018-12-04T23:46:19+5:302018-12-04T23:46:24+5:30
कणकवली : कणकवली तालुक्यातील खारेपाटण पोलीस चेकपोस्ट येथे १० लाख रुपये किमतीचे बिबट्याचे कातडे ताब्यात घेण्यात आले आहे. स्थानिक ...
कणकवली : कणकवली तालुक्यातील खारेपाटण पोलीस चेकपोस्ट येथे १० लाख रुपये किमतीचे बिबट्याचे कातडे ताब्यात घेण्यात आले आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग आणि वनविभागाच्या पथकाने संयुक्तरीत्या ही कारवाई मंगळवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास केली. या प्रकरणी रत्नागिरी जिल्ह्यातील तवेरा गाडीसह तिघांना अटक करण्यात आले आहे.
या प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्यांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील नीलेश विवेक मांडवकर (वय २९, रा. राजापूर, कोदीवली), परीक्षित जितेंद्र मयेकर (२५, रा. दापोली) आणि गोपाळ गणपत गडवार (२९, राजापूर, हर्डी) यांचा समावेश आहे. तवेरा या चारचाकी गाडीतून राजापूर ते कणकवली अशी बिबट्याच्या कातड्याची वाहतूक केली जात होती. ही गाडी गोपाळ गडवार चालवत होता.बिबट्याच्या कातड्याची मोठी तस्करी सह्याद्रीच्या पट्ट्यात केली जाते. विशेषत: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड व रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर या भागात कातडी खरेदी विक्रीचे मोठे व्यवहार होत असतात. अशाच एका व्यवहाराची माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाला मंगळवारी मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे उपनिरीक्षक रविराज फडणीस आणि कणकवली वनक्षेत्रपाल सर्जेराव सोनवडेकर यांच्या पथकाने मंगळवारी सायंकाळी ४ वाजता खारेपाटण येथे सापळा रचला होता.
या कारवाईच्या वेळी चार चाकी गाडीतून राजापूरहून तिघे संशयित बिबट्याचे कातडे घेऊन निघाले असल्याची माहिती वनक्षेत्रपालना देण्यात आली. स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने तसा सापळा रचून मुंबई गोवा महामार्गावरील खारेपाटण चेकपोस्ट येथे कारवाई केली. संशयित आरोपीना १० लाखांच्या कातड्यासह ताब्यात घेत तवेरा गाडी जप्त केली आहे. हे तिघे संशयित बिबट्याच्या कातडीचे तस्कर असावेत असा संशय आहे. त्यामुळे त्यादृष्टीनेही आता वनविभाग तपास करणार आहे. या कारवाईत स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस नाईक संतोष सावंत, संकेत खाडये, रवी इंगळे, अमित तेली, जयेश सरमळकर यांच्यासह वनविभागाचे वनपाल साटम, बडदे, शेगावे आदी सहभागी झाले होते.
कारवाईने सिंधुदुर्ग जिल्ह्यात खळबळ !
अलीकडेच कणकवली तालुक्यातील हुंबरठ येथेही अशीच कारवाई करण्यात आली होती. तशीच कारवाई पुन्हा खारेपाटण येथे झाली आहे. या प्रकरणी ताब्यात घेतलेले तिघेजण रत्नागिरी जिल्ह्यातील असले तरी कणकवली तालुक्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. वन्यप्राण्यांच्या कातडयाची तस्करी करणाऱ्यांचे धाबे या कारवाईमुळे दणाणले आहेत. या तिघांना आज, बुधवारी कणकवली येथील न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.