सैनिकांसाठी पाठविल्या १० हजार राख्या, मालवणच्या भंडारी कनिष्ठ महाविद्यालयाचा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2020 02:51 PM2020-07-21T14:51:56+5:302020-07-21T14:54:11+5:30

सीमेवर लढणाऱ्या भारतीय सैनिकांना मालवणच्या भंडारी कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी तब्बल १० हजार हाती बनविलेल्या राख्या पाठवून देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांप्रति प्रेम व्यक्त केले आहे.

10,000 Rakhis sent for soldiers, an initiative of Bhandari Junior College, Malvan | सैनिकांसाठी पाठविल्या १० हजार राख्या, मालवणच्या भंडारी कनिष्ठ महाविद्यालयाचा उपक्रम

मालवण येथील भंडारी कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी सैनिकांना राख्या पाठविल्या.

Next
ठळक मुद्दे सैनिकांसाठी पाठविल्या १० हजार राख्या, मालवणच्या भंडारी कनिष्ठ महाविद्यालयाचा उपक्रम विद्यार्थ्यांनी जीवनात देशसेवेच्या भावनेने कार्य करावे : जयंत जावडेकर

मालवण : सीमेवर लढणाऱ्या भारतीय सैनिकांना मालवणच्या भंडारी कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी तब्बल १० हजार हाती बनविलेल्या राख्या पाठवून देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांप्रति प्रेम व्यक्त केले आहे.

सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळत या राख्या पाठविण्याचा कार्यक्रम मालवण नगरपालिकेचे मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांच्या उपस्थितीत पार पडला. विशेष म्हणजे यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा व महाविद्यालये बंद असूनही विद्यार्थिनींनी गट करून घरीच राहून राख्या बनवून भारतीय वायुदल, नौदल व भूदल (लष्कर) या तिन्ही दलांसाठी राख्या पाठविल्या.

या कार्यक्रमाच्या अनुषंगाने कोरोना योद्धा म्हणून मालवण नगरपालिकेचे मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांना सुचिता केळुसकर हिच्या हस्ते प्रतीकात्मक राखी बांधण्यात आली. या उपक्रमासाठी पवन बांदेकर यांनी नियोजन करीत विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.

कोरोना आजाराची पार्श्वभूमी असतानाही विद्यार्थिनींचे गट बनवून यावर्षीही दहा हजारच्यावर म्हणजेच १०,१०३ राख्या बनविण्यात आल्या. यासाठी संस्थाध्यक्ष विजय पाटकर, प्राचार्य व्ही. जी. खोत तसेच कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक वर्गाचेही मार्गदर्शन व सहकार्य लाभले. राख्या पाठविण्यासाठी टेक्नोव्हा, मुंबईचे मालक मंगेश कुलकर्णी यांचे आर्थिक सहकार्य लाभले आहे.

या उपक्रमाबद्दल संस्थेचे अध्यक्ष विजय पाटकर, चेअरमन सुधीर हेरेकर, सचिव साबाजी करलकर व प्राध्यापकांनी विद्यार्थिनींचे कौतुक केले. ह्यरक्ताचे नाते असलेला भाऊ फक्त बहिणीचे रक्षण करतो. मात्र, आपण भारतमातेचे रक्षण करीत आहात व देशसेवेचे पवित्र कार्य आपल्याकडून अविरत घडत राहो. हीच ईश्वरचरणी प्रार्थनाह्ण असा शुभ संदेशही राख्यांसोबत सैनिकांना देण्यात आला आहे, अशी माहिती पवन बांदेकर यांनी दिली. यावेळी पर्यवेक्षक हणमंत तिवले, ग्रंथपाल प्रफुल्ल देसाई, देवेंद्र चव्हाण, गुरुदास दळवी, प्रभुदास आजगांवकर, सुनंदा वाईरकर, शिल्पा प्रभू व काही निवडक विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

देशसेवेतून कृतज्ञता व्यक्त

यावेळी जयंत जावडेकर म्हणाले, राख्या पाठविण्याच्या उपक्रमातून देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांप्रति प्रेम व कृतज्ञता व्यक्त करण्याचा विद्यार्थिनींनी केलेला प्रयत्न स्तुत्य आहे. देश ही केवळ भौगोलिक सीमा नसून देशातील लोकांच्या कार्यातून देश निर्माण होत असतो. म्हणूनच आपण देशासाठी काय करतो हे जास्त महत्त्वाचे असून विद्यार्थ्यांनी पुढील जीवनात देशसेवेच्या भावनेने कार्य करावे.

विद्यार्थिनींनी बनविलेल्या राख्या पंजाब, अरुणाचल प्रदेश, राजस्थान, मणिपूर, पश्चिम बंगाल, आसाम, सिक्किम, जम्मू-कश्मीर, लेह-लडाख, तसेच नौदलासाठी कारवार नेव्ही डॉक, मुंबई नेव्ही, पोरबंदर नेव्ही, कोची नेव्ही, विशाखापट्टणम, पोर्ट ब्लेअर, अंदमान व निकोबार, भारतीय वायू दलातील पठाणकोट, हरियाणा, पूलवामा, लेह-लडाख, जम्मू-काश्मिर, उधमपूर आदी ठिकाणी कार्यरत असणाऱ्या तीनही सैन्य दलातील सैनिकांना राख्या पाठविण्यात आल्या.
 

Web Title: 10,000 Rakhis sent for soldiers, an initiative of Bhandari Junior College, Malvan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.