कारवाईनंतर ११ कुटुंबांचे स्थलांतर

By admin | Published: June 26, 2016 12:36 AM2016-06-26T00:36:24+5:302016-06-26T00:36:24+5:30

प्रशासनाची तीन तास शिष्टाई : स्वत:हून स्थलांतराचा ग्रामस्थांचा निर्णय

11 families migration after action | कारवाईनंतर ११ कुटुंबांचे स्थलांतर

कारवाईनंतर ११ कुटुंबांचे स्थलांतर

Next

चिपळूण : ग्रामस्थांच्या विरोधानंतर प्रशासकीय कारवाई करण्यात आल्याने अखेर गोवळकोट कदम बौद्धवाडीतील सहा कुटुंबांनी स्थलांतरित होण्याचा निर्णय घेतला. जवळच असलेल्या पाच मुस्लिम कुटुंबांचेही स्थलांतर करण्यात आले. पाऊस मोठ्या प्रमाणावर पडला आणि धोकादायक स्थिती निर्माण झाली तर येथील अन्य कुटुंबांचेही स्थलांतर करण्यात येईल, असे उपविभागीय अधिकारी रवींद्र हजारे यांनी सांगितले.
गोवळकोट कदम बौद्धवाडी व त्यालगत असलेल्या मुस्लिम बांधवांची घरे मिळून २२ कुटुंबांना नैसर्गिक आपत्तीचा धोका असल्याने त्यांनी स्थलांतर करावे यासाठी उपविभागीय अधिकारी रवींद्र हजारे, उपविभागीय पोलिस अधिकारी महादेव गावडे, तहसीलदार जीवन देसाई, पोलिस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांच्यासह विविध स्तरावरील सामाजिक कार्यकर्त्यांनी गेले दहा ते बारा दिवस प्रयत्न सुरूकेले होते. परंतु, ग्रामस्थ स्थलांतराच्या विरोधात होते. या ग्रामस्थांचे जेथे पुनर्वसन होणार होते त्या गोवळकोट व पेठमाप मराठी शाळेत आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करण्यात आल्या होत्या. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सातत्याने पाठपुरावा करूनही स्थानिक ग्रामस्थ दाद देत नव्हते. प्रशासनाने दोन वेळा नोटीस देऊन अखेर शनिवारी कारवाई करण्याचा निर्णय घेतला.
सकाळी उपविभागीय अधिकारी हजारे, उपविभागीय पोलिस अधिकारी गावडे, तहसीलदार देसाई, पोलिस निरीक्षक मकेश्वर हे आपल्या सहकाऱ्यांसह कदम बौद्धवाडी येथील शांतिदूत बुद्धविहारात गेले. यावेळी ६० हून अधिक महिला व पुरुष पोलिस अधिकारी व कर्मचारी, महसूलचे मंडल अधिकारी, तलाठी व इतर कर्मचारी, नगर परिषदेचे अधिकारी व कर्मचारी असा ताफा हजर होता. साहित्य हलविण्यासाठी दोन ते तीन ट्रक दाखल होते. शांतिदूत बुद्धविहारात स्थलांतर करणाऱ्या ग्रामस्थांसह बैठक सुरू झाली. यावेळी संपूर्ण बौद्धवाडीला पोलिस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. भर पावसातही पोलिस कर्मचारी सज्ज होते. बैठकीत एकमत होत नव्हते.
आरोप-प्रत्यारोप व चर्चेचे गुऱ्हाळ तीन तास चालले. अधिकाऱ्यांची शिष्टाई सफल होत नसल्याने अखेर उपविभागीय अधिकारी हजारे यांनी स्वत:हून घरे खाली करा, अन्यथा प्रशासकीय कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. त्यानंतर अर्धा तास वाट पाहण्यात आली. वरिष्ठ लिपिक प्रकाश सावंत यांनी मेगा फोनद्वारे प्रशासनातर्फे सातत्याने आवाहन केले. सामाजिक कार्यकर्ते हेमंत शिरगावकर व रत्नागिरी जिल्हा मराठी पत्रकार परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनीही तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, ग्रामस्थ स्थलांतरित होण्यास तयार झाले नाहीत. पत्रकारांनी सातत्याने समजावून सांगितले. काहींचा याला पाठिंबा, तर काहींचा विरोध होता. अखेर ग्रामस्थ स्थलांतरित होण्यास विरोध करीत असल्याने उपविभागीय अधिकारी हजारे यांनी प्रशासकीय कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार पोलिसांनी जीवन गणपत कदम, जनार्दन भागुराम कदम व अशोक लक्ष्मण कदम यांना ताब्यात घेतले. त्यानंतर बाधीत कुटुंबीयांबाबत प्रदीप जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी आम्ही स्वत:हून जवळच्या नातेवाइकांकडे स्थलांतरित होतो, असे प्रशासनास सांगितले. आमचे पुनर्वसन व्हावे, अशी मागणी प्रदीप जाधव यांनी केली.
या सर्व घरांना सील ठोकण्यात आले आहे. एक कमिटी स्थापन करून सोमवार व गुरुवारी या सहाही घरांतील कुटुंबीयांना आपले जुजबी साहित्य सील उघडून काढून दिले जाईल. ही कमिटी सहाजणांची असेल. त्यामध्ये महसूल कर्मचारी, नगरपालिका कर्मचारी, पोलिस पाटील, दोन स्थानिक ग्रामस्थ व मुस्लिम समाजातील एक ग्रामस्थ यांचा समावेश असेल, असे उपविभागीय अधिकारी हजारे यांनी सांगितले. हे स्थलांतर तात्पुरते असून, आपले कायम पुनर्वसन करण्याच्या दृष्टीने सोमवारी महसूल कर्मचारी व स्थानिक ग्रामस्थ हे जागा पाहतील व योग्य त्या जागेचा प्रस्ताव केला जाईल, असे आश्वासन दिले. (प्रतिनिधी)

घरांना ‘सील’ ठोकले
किसन यशवंत कदम, दिनेश भागुराम कदम, प्रफुल्ल बबन कदम, सिद्धार्थ पांडुरंग कदम, जनार्दन भागुराम कदम व सिद्धार्थ लक्ष्मण कदम, ईस्माईल सुर्वे, ईसा हळदे, अब्दुल्ला सुर्वे, रिहाना सुर्वे व इक्बाल या ११ कुटुंबांचे पंचनामे करून त्यांची घरे सील केली. मुस्लिम कुटुंबीयांना पत्रकार व कोकण सिरत कमिटीचे सज्जाद काद्री, रफिक साबळे व मुजाहिद मेयर यांनी समजावले. त्यामुळे त्यांनीही आपला हेका सोडला. उपविभागीय अधिकारी रवींद्र हजारे, तहसीलदार जीवन देसाई, उपविभागीय अधिकारी महादेव गावडे यांनी या कुटुुंबीयांना पुनर्वसनाबाबत आश्वासन दिले आहे.
सर्वकाही ग्रामस्थांच्या सुरक्षिततेसाठी
ग्रामस्थ आपलेच आहेत. त्यांच्या जिवासाठीच हे सर्व चालले आहे. तरीही ते आढमुठेपणाने वागत असल्याने अगदी नाइलाजाने त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारावा लागला; परंतु ते आता सामंजस्याने घेत असल्याने प्रशासनही त्यांना संपूर्ण सहकार्य करील. त्यांचे कायमस्वरुपी पुनर्वसन व्हावे यासाठी सोमवारी स्थानिक ग्रामस्थ व महसूल कर्मचारी जागा पाहतील व सोयीच्या जागेवर पुनर्वसनाचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला जाईल, असे उपविभागीय अधिकारी रवींद्र हजारे यांनी सांगितले.

आम्ही इथेच मरू : सकाळपासून पोलिस अधिकारी व कर्मचारी कदम बौद्धवाडीत ताटकळत उभे होते. स्थानिक ग्रामस्थ अधिकाऱ्यांस जुमानत नव्हते. अधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने तडजोड करण्याचा प्रयत्न केला. परंतु, ग्रामस्थ ते मान्य करीत नव्हते. आम्ही २५ वर्षे झगडत आहोत, आता काय व्हायचे ते होऊ दे, आम्ही येथेच मरू; परंतु बाहेर जाणार नाही, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली होती. त्यामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांना नाइलाजास्तव कारवाई करणे भाग पडले. तिघांना ताब्यात घेतल्यानंतर स्थानिक ग्रामस्थांनी स्थलांतर करण्यास सहमती दर्शविली.
 

Web Title: 11 families migration after action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.