११ अर्ज अवैध
By admin | Published: February 7, 2017 11:04 PM2017-02-07T23:04:47+5:302017-02-07T23:04:47+5:30
अर्जांची छाननी; जि.प.चे ५, पं.स. चे ६ उमेदवार
सिंधुदुर्गनगरी : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी दाखल करण्यात आलेल्या नामनिर्देशनपत्रापैकी मंगळवारी करण्यात आलेल्या छाननीअंती ११ उमेदवारी अर्ज अपात्र ठरविण्यात आले आहेत. यात जिल्हा परिषद गटातील ५ तर पंचायत समित्यांच्या गणातील ६ नामनिर्देशनपत्र अवैध झाली आहेत. त्यामुळे आता जिल्हा परिषद गटासाठी २२६ तर पंचायत समिती गणासाठी ४१६ नामनिर्देशनपत्र वैध ठरली आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत ज्याठिकाणी अपिल नसेल त्या ठिकाणी १३ फेब्रुवारी तर ज्या ठिकाणी अपिल असेल अशा ठिकाणी १५ फेब्रुवारीपर्यंत राहणार आहे. त्यानंतर जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या १५० जागांसाठी किती उमेदवार निवडणूक आखाड्यात आहेत ते चित्र स्पष्ट होणार आहे. दरम्यान प्राप्त झालेल्या उमेदवारी अर्जांमधील पात्र तसेच अपात्र उमेदवारी अर्जासोबत जिल्हा न्यायाधीशांकडे अपील दाखल करण्याची अंतिम तारीख १० फेब्रुवारी आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी ६ फेब्रुवारीपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख होती. या जिल्हा परिषदेच्या ५० जागांसाठी २३१ एवढे उमेदवारी अर्ज प्राप्त झाले होते. तर पंचायत समितीसाठीच्या १०० जागांसाठी ४२२ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. मंगळवारी या प्राप्त उमेदवारी अर्जांच्या छाननीची प्रक्रिया पार पडली. यात जिल्हा परिषदेच्या पाच उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र अवैध ठरविण्यात आले तर, पंचायत समितीमध्ये ६ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरविण्यात आले आहेत.
तालुकावार वैध व अवैध अर्ज
वैभववाडी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या एकूण १२ अर्जांपैकी १० वैध तर २ अवैध तसेच पंचायत समितीच्या एकूण २४ अर्जांपैकी २२ वैध तर २ अवैध अर्ज ठरले आहेत. कणकवली तालुक्यातील जिल्हा परिषदेसाठी प्राप्त सर्व २९ उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. तर पंचायत समितीच्या एकूण प्राप्त ५३ अर्जांपैकी ५३ अर्ज वैध ठरले आहेत.
देवगड तालुक्यातून एकूण प्राप्त २१ अर्जापैकी २१ अर्ज वैध ठरले आहेत. तर पंचायत समितीच्या एकूण ३८ प्राप्त अर्जांपैकी ३८ अर्ज वैध ठरले आहेत.
मालवण तालुक्यातून जिल्हा परिषदेच्या जागांसाठी एकूण प्राप्त ३४ अर्जांपैकी ३३ अर्ज वैध तर १ अर्ज अवैध ठरला आहे. तर पंचायत समितीच्या जागांसाठी प्राप्त ६४ अर्जांपैकी ६३ अर्ज वैध ठरले असून १ अर्ज अवैध ठरला आहे.
कुडाळ तालुक्यातून जिल्हा परिषदेच्या ५० प्राप्त अर्जापैकी ५० अर्ज वैध ठरले आहेत. तसेच पंचायत समितींच्या जागांसाठी ७५ पैकी ७५ अर्ज वैध ठरले आहेत.
वेंगुर्ले तालुक्यातून जिल्हा परिषदेच्या ३१ अर्जांपैकी २९ अर्ज वैध ठरले असून २ अर्ज अवैध ठरले आहेत. तर पंचायत समितीच्या जागांसाठी प्राप्त ५३ अर्जांमधून ५२ अर्ज वैध तर १ अर्ज अवैध ठरला आहे.
सावंतवाडीतून जिल्हा परिषदेच्या जागांसाठी प्राप्त झालेले ३६ पैकी ३६ अर्ज वैध ठरले आहेत. तर पंचायत समितीच्या जागांसाठी प्राप्त ७४ अर्जातून ७३ अर्ज वैध ठरले असून १ अर्ज अवैध ठरला आहे.
दोडामार्ग तालुक्यातून जिल्हा परिषदेच्या १८ प्राप्त अर्जापैकी १८ अर्ज वैध ठरले आहेत. तसेच पंचायत समितींच्या जागांसाठी प्राप्त झालेल्या एकूण ४१ अर्जातून ४० वैध तर १ अर्ज अवैध ठरला आहे.
(प्रतिनिधी)