सावंतवाडी तालुक्यातील 1179 शेतकरी कुटुंबाना पहिला हप्ता प्राप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 11:27 AM2019-02-28T11:27:54+5:302019-02-28T11:31:07+5:30
शेतकऱ्यांचे जीवन मान उंचावणे व कृषि उत्पन्न दुप्पट वाढवणे या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत सावंतवाडी तालुक्यातील 1179 शेतकरी कुटुंबांच्या बँक खात्यामध्ये या निधीचा पहिला हप्ता जमा झाला आहे.
सिंधुदुर्गनगरी : शेतकऱ्यांचे जीवन मान उंचावणे व कृषि उत्पन्न दुप्पट वाढवणे या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत सावंतवाडी तालुक्यातील 1179 शेतकरी कुटुंबांच्या बँक खात्यामध्ये या निधीचा पहिला हप्ता जमा झाला आहे.
या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 2645 शेतकरी कुटुंबांना पहिला हप्ता मिळाला आहे. त्यामध्ये कुडाळ तालुक्यातील 985, कणकवली तालुक्यातील 264, मालवण तालुक्यातील 195, दोडामार्ग तालुक्यातील 20 शेतकरी कुटुंबांचा समावेश आहे. यामध्ये अनुसुचित जातींचे 73 तर अनुसुचित जमातींच्या 10 लाभार्थी कुटुंबांचा समावेश आहे.
या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना तीन टप्प्यांमध्ये वार्षिक सहा हजार रुपयांचा निधी दिला जाणार आहे. यासाठी जिल्हा, तालुका व ग्राम स्तरावर समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमार्फत दोन हेक्टर व त्यापेक्षा कमी धारण क्षेत्र असणाऱ्या शेतकरी कुटुंबांची माहिती संकलीत करण्यात येत आहे. त्यामध्ये आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक, बँक खाते क्रमांक, आयएफएससी कोड यांचा समावेश आहे.
पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील 2645 शेतकरी कुटुंबांच्या बँक खात्यामध्ये निधीचा पहिला हप्ता जमा करण्यात आला आहे. तर आतापर्यंत देशभरातील 1 कोटी 1 लाख शेतकरी कुटुंबाना या निधीचा लाभ दिला आहे. त्यामध्ये राज्यातील 14 लाख 26 हजार 927 शेतकरी कुटुबांचा समावेश आहे.