वेंगुर्ले तालुक्यात १२ उमेदवारांचे ‘डिपॉझिट’ जप्त
By admin | Published: March 7, 2017 09:41 PM2017-03-07T21:41:37+5:302017-03-07T21:41:37+5:30
दोन्ही निवडणुकीत प्रत्येकी सहाजण
वेंगुर्ले : पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या निवडणुकीत तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सहा, तर पंचायत समितीसाठी सहा मिळून एकूण १२ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. डिपॉझिट जप्त झालेल्या उमेदवारांमध्ये वेंगुर्ले पंचायत समितीचे माजी सभापती अभिषेक चमणकर यांचा समावेश आहे.यंदा झालेली जिल्हा परिषद, तसेच पंचायत समिती निवडणूक कित्येक उमेदवारांची परीक्षा घेणारी ठरली. या निवडणुकीत जिल्हा परिषदेसाठी दिग्गज उभे होते. तरीही त्यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला.
वेंगुर्ले तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या पाच जागांसाठी उभे असलेल्या काही उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. त्यात जिल्हा परिषद गटातील म्हापण मतदारसंघात विकास गवंडे, तुळस-संदीप पेडणेकर, उभादांडा-माजी सभापती अभिषेक चमणकर, मकरंद परब, रेडी-गोपाळ बटा, नवसो राऊत, आदी उमेदवारांना कमी मते मिळाल्यामुळे ते आपली अनामत रक्कम वाचवू शकले नाहीत. तालुक्यातील पंचायत समिती गणामधून तुळस पंचायत समिती मतदारसंघात उभे असलेले दत्ताराम माळकर, मातोंड-विशाल बागायतकर, उभादांडा-रामेश्वरी गवंडे, आसोली-अनिल तारी, रेडी-नंदकुमार मांजरेकर, शिरोडा-धनंजय परब यांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. त्यामुळे मतदारांनी बड्या नेत्यांनाही दणका दिला आहे. (प्रतिनिधी)
चमणकरांना धक्का --यात विशेष म्हणजे वेंगुर्ले पंचायत समितीचे माजी सभापती तथा विद्यमान सदस्य अभिषेक चमणकर हे उभादांडा जिल्हा परिषद मतदारसंघातून उभे राहिले होते. त्यांना सर्वांत कमी मते मिळाल्यामुळे ते आपली अनामत रक्कमही वाचवू शकले नाहीत. यामुळे त्यांना धक्का बसला आहे.बड्या नेत्यांनाही मतदारांनी या निवडणुकीत चांगलाच दणका दिल्याचे या आकडेवारीवरून दिसून आले.