दीड लाख भाविकांनी घेतले बाबरशेखांचे दर्शन
By admin | Published: February 4, 2015 10:15 PM2015-02-04T22:15:34+5:302015-02-04T23:53:32+5:30
गावातील अनेक तरूणांनी या खेळात सहभाग घेतला होता. बाबरशेखावर श्रद्धा असणारे अनेक लोक या खेळात आपल्यावर जीवघेण्या शस्त्रांचा मारा करून घेतात.
टेंभ्ये : हातिस येथील पीर बाबरशेख उरूसाच्या दुसऱ्या दिवशी बुधवारी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यंदा दीड लाखापेक्षा अधिक भाविकांनी बाबरशेखांचे दर्शन घेतल्याचे हातिस ग्रामविकास मंडळाच्या स्वयंसेवकांकडून सांगण्यात आले. हातिसमधील युवकांनी दर्ग्यावर केलेली फुलांची सजावट भाविकांना आकर्षित करून गेली. पण, रस्त्याच्या दुरावस्थेबाबत मात्र नाराजीचा सूर ऐकायला मिळाला.मंगळवारी पहिल्यादिवशी रात्री चंदनाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर प्रथम हातिस येथील व नंतर इब्राहीम पट्टण येथील ग्रामस्थांनी बाबरशेखांच्या कबरीवर गिलाफ चढवला. त्यानंतर, सुरु झालेला शस्त्रास्त्रांचा खेळ पाहण्यास भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. गावातील अनेक तरूणांनी या खेळात सहभाग घेतला होता. बाबरशेखावर श्रद्धा असणारे अनेक लोक या खेळात आपल्यावर जीवघेण्या शस्त्रांचा मारा करून घेतात. यानंतर, गाऱ्हाणी घालण्याचा कार्यक्रम सुरु करण्यात आला. बुधवार संध्याकाळपर्यंत भाविकांच्या माध्यमातून मनोभावे गाऱ्हाणी घातली जात होती.बुधवारी पहाटेपासून भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे पहायला मिळत होते. दुचाकी, चारचाकी, एस.टी. बसेस व चालत जाणाऱ्या भाविकांमुळे रस्त्याल मोठ्या प्रमाणात गर्दी पहायला मिळत होती. वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असल्याने, अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी होताना दिसत होती. यावेळी पोलिसांना वाहतूक सुरळीत करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत होती. दुसऱ्या दिवशी भाविकांनी केलेली प्रचंड गर्दी, हे यावर्षीच्या उरूसाचे एक प्रमुख वैशिष्ट्य पहायला मिळत होते. बुधवारी संध्याकाळी उशिरापर्यंत भाविक मोठ्या संख्येने दर्शनाला येत होते. हातिसमधील युवकांनी दर्ग्याच्या भिंतीवर फुलांची केलेली सजावट लक्षवेधी होती.दर्शनाला येणाऱ्या भाविकांमधून रस्त्याच्या दुरवस्थेबाबत मात्र
नाराजी व्यक्त केली जात होती. वास्तविक उरूसाच्यापूर्वी रस्त्याचे डांबरीकरण होणे अपेक्षित होते. प्रशासनाने मात्र याकडे पूर्णत: दुर्लक्ष केले आहे. (वार्ताहर)
‘गैरसोय होणार नाही’ यासाठी प्रयत्नशील
पीर बाबरशेख उरुसाला संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक येतात. अतिशय मनोभावे पीर बाबरशेखांचे दर्शन घेऊन, आपले गाऱ्हाणे त्यांच्यासमोर मांडतात. हातिस ग्रामविकास मंडळाच्यावतीने भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही, यासाठी प्रयत्न केले जातात. ऊरुस यशस्वी होण्यामध्ये, भाविकांचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे असते. त्यामुळे, हातिस ग्रामविकास मंडळाच्यावतीने भाविकांना धन्यवाद देत असल्याचे अध्यक्ष डॉ. दिलीप नागवेकर यांनी सांगितले.