कोकणातील १२ रेल्वे स्थानकांचे सुशोभिकरण होणार; शिंदे-फडणवीसांनी केले भूमिपूजन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2023 07:10 PM2023-08-08T19:10:17+5:302023-08-08T19:15:01+5:30
करारानुसार प्रवाशांची वर्दळ असणाऱ्या महत्त्वाच्या १२ रेल्वे स्थानकांचे काम पहिल्या टप्प्यात हाती घेण्यात आले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १२ रेल्वे स्थानकांच्या रस्ते काँक्रिटीकरण व सुशोभिकरण कामाचे भूमिपूजन करण्यात आले. जनतेच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवण्याच्यादृष्टीने रोजगार,आरोग्य, शिक्षण, दळणवळण यासह मूलभूत सोयीसुविधा जनसामान्यांना सुलभतेने उपलब्ध करुन देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. कोकणातील दळवळण सुविधांमध्ये वाढ करण्यास आणि पायाभूत सुविधा उभारण्यास सरकारचे प्राधान्य असून कोकणच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली.
कोकणातील पर्यटनाला चालना देण्याकरिता रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोकण रेल्वे स्थानकांच्या पोहोच मार्गाची देखभाल दुरुस्ती व परिसराचे सुशोभिकरण करण्यात येणार आहे त्यासाठी कोकण रेल्वे महामंडळ मर्यादित आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला होता. या करारानुसार प्रवाशांची वर्दळ असणाऱ्या महत्त्वाच्या १२ रेल्वे स्थानकांचे काम पहिल्या टप्प्यात हाती घेण्यात आले आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पात या स्थानकांवरील कामांकरिता ५६.२५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून या कामांचे भूमिपूजन आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नुकतेच देशातील ५०८ रेल्वे स्थानकांचा कायापालट करणाऱ्या ‘अमृत भारत स्थानक’ उपक्रमाची सुरूवात केली आहे. राज्यातील ४४ स्थानकांचा त्यात समावेश आहे. त्या पार्श्वभूमीवर कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली, सिंधुदुर्गनगरी, कुडाळ, आणि सावंतवाडी रेल्वेस्थानक यांना जोडणाऱ्या रस्त्यांच्या काँक्रीटीकरण व सुशोभिकरणाचे काम सुरु होत आहे, ही स्वागतार्ह बाब आहे.यामुळे कोकणच्या पर्यटनाचा व्यापक विस्तार होण्यासाठी निश्चितच लाभ होईल. पर्यटकांना, स्थानिक रहिवाशांना या माध्यमातून चागंल्या सोयी सुविधा उपलब्ध होतील. त्याचसोबत कोकणातील पर्यटन वृद्धीला ही यामुळे मोठी चालना मिळेल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
मुख्यमंत्री @mieknathshinde यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांच्या प्रमुख उपस्थितीत रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १२ रेल्वे स्थानकांच्या रस्ते काँक्रिटीकरण व सुशोभिकरण कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) August 8, 2023
मंत्रालयात आयोजित या कार्यक्रमास सार्वजनिक बांधकाम… pic.twitter.com/XrD65REEyI
'या' १२ रेल्वे स्थानकांचे होणार सुशोभिकरण-
- रायगड जिल्हा- वीर, माणगाव आणि कोलाड
- रत्नागिरी जिल्हा – चिपळूण, रत्नागिरी, संगमेश्वर, राजापूर आणि खेड
- सिंधुदुर्ग जिल्हा – कणकवली, सिंधुदुर्गनगरी, कुडाळ आणि सावंतवाडी