१२0 जण दगावले
By Admin | Published: March 23, 2015 11:00 PM2015-03-23T23:00:18+5:302015-03-24T00:17:59+5:30
पाच वर्षातील स्थिती : जिल्ह्यात ५५१५ क्षयरोगाने रूग्ण बाधित
गिरीश परब - सिंधुदुर्गनगरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात गत पाच वर्षात १२० क्षयरूग्णांचा मृत्यू झाला असल्याचे क्षयरोग विभागाच्या अहवालादरम्यान उघड झाले आहे. सन २०११ मध्ये सर्वाधिक म्हणजेच ३८ क्षयरूग्णांचा मृत्यू झाला आहे. गत पाच वर्षात एकूण ५५१५ क्षयरोगबाधीत रूग्ण आढळले असून त्यापैकी १ हजार ६७४ रूग्ण हे औषधोपचाराअंती बरे झाले आहेत.
क्षयरोग हा एक जीवघेणा आजार म्हणून प्राचीन काळापासून प्रचलित आहे. मात्र आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात या जीवघेण्या आजारावर प्रभावी औषधे उपलब्ध झाली आहेत. त्यामुळे पूर्वीच्या तुलनेत आता क्षयरोगाने मृत्यू होणाऱ्या रूग्णांची संख्या कमी होताना दिसून येत आहे. या रोगाने मृत्यू होण्याचे आणखीन एक कारण म्हणजे जनतेमध्ये या आजाराबाबत झालेली जनजागृती. तसेच क्षयरोग विभागामार्फत करण्यात येणाऱ्या यशस्वी कामकाजाच्या जोरावर आज काही प्रमाणात या रोगाने मृत्यू होणाऱ्या रूग्णांच्या संख्येवर आळा बसला आहे. जिल्ह्यात सन २००२ पासून सुधारीत क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम सुरू झाला. या अंतर्गत थुंकी नमुने तपासून संबंधित रूग्णांवर औषधोपचार करण्यात येतात. ही तपासणी मोफत असते. क्षयरोग आजाराविषयी मागील पाच वर्षांची आकडेवारी लक्षात घेता सन २०११ मध्ये ४३७ नवीन थुंकी दुषित रूग्ण आढळले होते. त्यात तब्बल ३८ रूग्णांचा आजाराने मृत्यू झाला होता. त्यानंतर मृत्यूचे प्रमाण हे २०१२ नंतर कमी कमी होत गेले. सन २०१४ मध्ये ३७५ रूग्णांना क्षयरोग हा आजार जडला होता. त्यात १८ जणांचा मृत्यू झाला होता.
लोकमत
विशेष
क्षयरोग कसा होतो ?
क्षयरोग हा संसर्गजन्य रोग आहे. तो ‘मायक्रो बॅक्टेरिअम ट्युबर क्युलोसिस’ या अतिसुक्ष्म जंतुंमुळे होतो. फुफ्फुसाचा क्षयरोग झालेली रोगी जेव्हा खोकतो, त्यावेळी त्याच्या शरीरातील जंतू हवेत फेकले जातात व ते हवेत तरंगत राहतात. अशी हवा श्वसनामार्फत अन्य निरोगी व्यक्तीच्या शरीरात गेल्यास त्याला क्षयरोग होऊ शकतो. फुफ्फुसातील क्षयाचे जंतु शरीरात अन्य ठिकाणी गेल्यास इतर अवयवांचाही क्षयरोग होतो.
क्षयरोग आता बऱ्यापैकी आटोक्यात आला असून रूग्णाला कमी प्रमाणात आढळू लागले आहेत ही निश्चितच चांगली बाब असली तरी भविष्यात क्षयरोगाने एकाही रूग्णाचा मृत्यू होणार नाही यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. यावर मात करण्यासाठी सामुहिक प्रयत्नांची गरज आहे. संबंधित क्षयरोग बाधित रूग्णांनीही सहकार्य करावे.
- डॉ. बी.डी. खाडे,
जिल्हा क्षयरोग अधिकारी
२१ सुक्ष्मदर्शी केंद्रे
क्षयरोगबाधीत किंवा संशयित रूग्णाला क्षयरोग निदान चाचणी करण्यासाठी सोपे जावे यासाठी शासनाने मान्यताप्राप्त २१ सूक्ष्मदर्शी केंद्राची स्थापना केली आहे.
ही केंद्रे सर्व ग्रामीण रूणालयात, उपजिल्हा रूग्णालयात, काही प्राथमिक आरोग्य केंद्रात व ३ खासगी डॉक्टरांकडे स्थापन करण्यात आली आहेत.
यात संशयित रूग्णांची थुंकी तपासणे, एक्स- रे काढणे, औषधोपचार करणे आदी मोफत सुविधा या केंद्रांमार्फत पुरविण्यात येतात.
जागतिक क्षयरोग दिनाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात क्षयरोगबाधीत रूग्णांची शोधमोहीम सप्ताह सुरू झाला असून त्याची सुरूवात वैभववाडी तालुक्यातून करण्यात आली आहे.
टप्प्याटप्प्याने संपूर्ण जिल्हाभर हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. रूग्णांचा शोध घेऊन त्यांच्यावर औषधोपचार सुरू होणार आहेत.
या दिनाच्या पार्श्वभूमीवर सकाळी वेंगुर्ले तालुक्यातील होडावडे येथे जनजागृतीपर रॅली काढण्यात येणार आहे.
तसेच जिल्हा रूग्णालयाच्या टीबी वॉर्डमधील रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांना या आजाराबाबत माहिती देऊन त्यांना कोणती खबरदारी घेणे आवश्यक आहे हे सांगण्यात येणार आहे.
दोन आठवड्यापेक्षा जास्त कालावधीचा खोकला.
वजन कमी होणे
छातीत दुखणे
दम लागणे
ताप येणे
भूक कमी लागणे
रोगाचे प्रमाण वाढल्यास बेडक्यातून रक्त पडणे
औषधोपचार
एम.डी.आर.टी.बी.चे रोगनिदान निश्चित झाल्यास संबंधित रूग्णास डॉट्स प्लस साईटकडे पाठविले जाते.
सर्व तपास केल्यानंतरच रूग्णास कॅट-४ चा औषधोपचार सुरू केला जातो व ६ ते ९ महिन्यात या रोगाचा रूग्ण बरा होतो.
आजाराच्या गंभीर अवस्थेत त्वचेखाली, मेंदूत रक्तस्त्राव
होतो.