‘नवोदय’ च्या १२९ विद्यार्थ्यांना विद्यालयातील अन्नातून विषबाधा, सांगेली येथील प्रकार : काहींची प्रकृती होती गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2024 08:53 AM2024-03-09T08:53:01+5:302024-03-09T08:53:36+5:30
सायंकाळी उशिरा मिळालेल्या माहितीनुसार सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती सुधारत असल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील सांगेली येथील जवाहर नवोदय विद्यालयात शिकणाऱ्या तब्बल १२९ विद्यार्थ्यांना गुरूवारी रात्री अन्नातून विषबाधा झाली आहे. त्यांना अधिक उपचारासाठी सांगेली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. मात्र काहींची प्रकृती थोडी गंभीर असल्याने त्यांना सावंतवाडी व कुडाळ येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. सायंकाळी उशिरा मिळालेल्या माहितीनुसार सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती सुधारत असल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
हा प्रकार शुक्रवारी पहाटेच्या सुमारास विद्यार्थ्यांना जुलाब व उलटी झाल्यानंतर उघडकीस आला असून सध्या मुलांची प्रकृती सुधारत असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. सावंतवाडी तालुक्यातील सांगेली येथील नवोदय विद्यालयात ४०८ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. हे सर्वच विद्यार्थी निवासी असून त्यांना विद्यालयातील मेस मधून जेवण दिले जाते. तसे या विद्यार्थ्यांनी गुरूवारी रात्रीच्या सुमारास जेवण देण्यात आले होते.
सर्वच मुले निवासी, पालकांनी दिली माहिती
सर्वच मुले निवासी असल्याने त्याचे आई-वडील गावी असतात. त्यांना ही माहिती देण्यात आली आहे. तसेच विद्यालयाचे शिक्षक ही विद्यार्थ्यांची विशेष काळजी घेत आहेत. विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांत पाचवीपासून नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
आरोग्य अधिकाऱ्यांसह वैद्यकीय पथक दाखल
दरम्यान या घटनेची दखल घेऊन जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक हे सांगेली येथील आरोग्य केंद्रात पाठवले. यात यात जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. सई धुरी, वर्षा शिरोडकर, गौरी तानवडे, डॉ. मिलिंद खानोलकर यांचा समावेश आहे.ते विद्यार्थ्यावर विशेष लक्ष ठेवून आहेत.
जेवणातील पदार्थ बदलला
विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या जेवणात नेहमीची बटाट्याची भाजी नव्हती. वेगळी मसाला बटाटा भाजी होती. तसेच जिरा भात होता असे विद्यार्थी सांगत होते. किचनमध्ये ही ठेवण्यात आलेल्या भाज्या या खराब झाल्या होत्या. चपाती ही योग्य नव्हती असा आरोप पालकांनी केला आहे.
सध्यातरी जेवणातून घडला प्रकार
- घटनेनंतर सांगेली येथील आरोग्य केंद्रात दाखल झालेल्या वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी हा सर्व प्रकार जेवणातून घडल्याचे मान्य केले. तसेच हा प्रकार जेवणातून विषबाधा आहे. असे ही वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले मात्र जेवण तपासणीनंतर खरे कारण स्पष्ट होणार आहे.
- घटनेनंतर विद्यार्थ्याचे पालक शाळेत दाखल झाले असून सायंकाळी उशिरा पालकमंत्री रवींद्र चव्हाण जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी सांगेली येथे भेट देऊन विद्यार्थ्यांची विचारपूस ही केली.