जिल्ह्यात १२ काथ्या उद्योग उभारणार
By admin | Published: March 27, 2017 11:54 PM2017-03-27T23:54:48+5:302017-03-27T23:54:48+5:30
दीपक केसरकर : बचत गटातून महिलांनी आर्थिक उन्नती साधावी; कुडाळमध्ये सिंधुसरस प्रदर्शनाचे उद्घाटन
कुडाळ : जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे असून जिल्ह्यात काथ्या उद्योगाचे १२ कारखाने उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे महिलांनी बचतगटातून आर्थिक उन्नती साधावी, असे आवाहन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले.
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा विभागाच्यावतीने बचतगटांच्या वस्तंूचे ‘सिंधुसरस प्रदर्शन व विक्री कार्यक्रम २०१७’ व राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कार वितरण सोहळ््याचे आयोजन २६ ते २७ मार्च या कालावधीत कुडाळ हायस्कूलच्या मैदानावर करण्यात आले आहे. या सिंधुसरस प्रदर्शनाचे उद्घाटन पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते झाले.
यावेळी व्यासपीठावर आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी उदय चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह, प्रकल्प संचालक सुनील रेडकर, जिल्हा परिषद सदस्य अमरसेन सावंत, जिल्हा परिषद सदस्या वर्षा कुडाळकर, अनुप्रिती खोचरे, कुडाळ पंचायत समिती सभापती राजन जाधव, उपसभापती श्रेया परब, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आर. के. जोशी, कणकवली उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर, सावंतवाडी नगराध्यक्ष बबन साळगावकर, नगरसेवक अभय शिरसाट तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री केसरकर म्हणाले, शासनाच्या ग्राम विकास विभागामार्फत सन १९९९ पासून दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील व्यक्तींचे जीवनमान उंचावण्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान योजना राबविण्यात येत आहे. यामध्ये स्वयंसहाय्यता गट, स्वरोजगारी यांना व्यवसायाभिमुख प्रशिक्षण देण्यात येते. या स्वरोजगारीने तयार केलेल्या वस्तूंना हक्काची बाजारपेठ मिळावी, याकरिता राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाचा महिला बचतगटांनी लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी
केले. पहिल्याच दिवशी सिंधुसरस प्रदर्शन पाहण्यासाठी जिल्ह्यासह कुडाळ तालुक्यातील नागरिकांनी गर्दी केली होती. (प्रतिनिधी)