Sindhudurg: इन्कमटॅक्स'मधील सेवानिवृत्त अधिकाऱ्याला ईडीची भीती दाखवत घातला १३ लाखांचा गंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 17:51 IST2025-03-04T17:50:50+5:302025-03-04T17:51:19+5:30

विविध बँक खात्यात भरणा : सायबर सेलकडे तक्रार  

13 lakhs fraud to a retired officer of the Income Tax Department fearing the ED | Sindhudurg: इन्कमटॅक्स'मधील सेवानिवृत्त अधिकाऱ्याला ईडीची भीती दाखवत घातला १३ लाखांचा गंडा

Sindhudurg: इन्कमटॅक्स'मधील सेवानिवृत्त अधिकाऱ्याला ईडीची भीती दाखवत घातला १३ लाखांचा गंडा

बांदा : इन्कमटॅक्स विभागातील सेवानिवृत्त अधिकाऱ्याला ईडी कारवाईची भीती दाखवत तब्बल १३ लाख रुपयांना गंडा घातल्याची खळबळजनक घटना घडली आहे. संबंधित अधिकाऱ्याने संशयिताच्या सांगण्यावरून पूर्ण रक्कम धनादेशाच्या माध्यमातून तीन विविध बँक खात्यात गेल्या आठ दिवसांत भरणा केली.

सोमवारी, ३ मार्च रोजी सुद्धा ते उर्वरित चार लाख रुपये बँकेत भरण्याच्या तयारीत होते; मात्र तत्पूर्वी त्यांना आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी रविवारी सायंकाळी उशिरा बांदा पोलिस ठाणे गाठले. सायबर सेलकडे तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. ते निवृत्त अधिकारी बांदा दशक्रोशीतील आहेत.

 ते अधिकारी सेवानिवृत्त झाल्याने  आपल्या गावी मुक्कामी आहेत. दहा दिवसांपूर्वी त्यांना ईडी अधिकारी असल्याचे भासवून त्यांच्या मोबाईलवर फेक कॉल आला. आपण ज्या कार्यालयात सेवा केली त्या सेवेच्या कार्यकाळात झालेल्या आर्थिक व्यवहारांची चौकशी झाली आहे. त्यात आपण दोषी असल्याचे समोर येत आहे. यातून बाहेर पडण्यासाठी तसेच गैरव्यवहार झालेली रक्कम तत्काळ भरावी असे बजाविले. या फेक कॉलमुळे संबंधित अधिकारी भयभीत झाले.

यावेळी त्यांनी रक्कम भरण्याची तयारी दर्शविली. एकूण १७ लाख रुपये भरण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकण्यात आला. संबंधित व्यक्तीने त्यांना चेकच्या माध्यमातून पैसे भरण्यास सांगून विविध बँक खात्यांची माहिती पाठविली. त्यांनी गेल्या आठ दिवसात विविध बँक खात्यातून तब्बल १३ लाख रुपये वर्ग केले.

उर्वरित चार लाख रुपये  सोमवारी बँकेच्या खात्यात भरणार होते; मात्र त्यांना  फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी रविवारी बांदा पोलिस ठाणे गाठले. पोलिस निरीक्षक विकास बडवे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी १९०३ या नंबरवर ऑनलाईन तक्रार दाखल केली.

सायबर गुन्ह्याबाबत सध्या पोलिस प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात जनजागृती सुरू आहे.  अशा गुन्ह्याबाबत सर्वांनी सावध रहावे. अनोळखी फोन कॉल किंवा मेसेज लिंकला उत्तर देऊ नका. पैसे मागण्यासाठी फोन आल्यास याची कल्पना   पोलिसांना द्यावी. फसवणूक झालेल्या सेवानिवृत्त अधिकाऱ्यांनी ऑनलाईन तक्रार नोंदविली आहे. - विकास बडवे, बांदा पोलिस निरीक्षक

Web Title: 13 lakhs fraud to a retired officer of the Income Tax Department fearing the ED

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.