विद्यार्थ्यांकडून १३० किलोमीटरचा सायकल प्रवास
By admin | Published: January 10, 2016 11:42 PM2016-01-10T23:42:22+5:302016-01-11T00:35:53+5:30
विद्यार्थ्यांचे कौतुक : अॅड़ बाबासाहेब नानल गुरुकुलची रत्नागिरी - आंबोळगड यशस्वी सायकल सफर
रत्नागिरी : अॅड. बाबासाहेब नानल गुरुकुल म्हणजे उपक्रमातून शिक्षण देणारा रा. भा. शिर्के प्रशालेचा गुरुकुल प्रकल्प! विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी गुरुकुल अनेक उपक्रमांचे आयोजन करत असते. त्यापैकीच एक म्हणजे सायकल सहल होय. गुरुकुलमधील इयत्ता पाचवी ते सहावीच्या विद्यार्थ्यांची रत्नागिरी ते पावस अशी सायकल सहल आयोजित करण्यात आली होती, तर सातवी ते नववीच्या विद्यार्थ्यांची सायकल सहल रत्नागिरी ते आंबोळगड अशी आयोजित करण्यात आली होती.
गुरुकुल व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रघुवीर भिडे व गुरुकुलचे पालक यांच्या उपस्थितीत या सायकल सहलीचे उद्घाटन झाले. त्यानंतर रत्नागिरीतील शिर्के हायस्कूलमधून सायकल सहलीला सुरुवात झाली. सायकल चालविण्यास मुले फारच उत्सुक होती. सकाळी ११ वाजता सर्व मुले पावस येथे पोहोचली. त्यातील इयत्ता पाचवी ते सहावीच्या मुलांनी स्वामी स्वरुपानंदांचे दर्शन घेऊन दुपारी २ वाजता परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. उर्वरित मुले आंबोळगडाच्या दिशेने रवाना झाली. सायंकाळी ६.३० वाजता ही सर्व मुले आंबोळगडावर पोहोचली. तेथे रात्रभराच्या विश्रांतीनंतर सकाळी ९ वाजता परतीच्या प्रवासाला निघाली व रत्नागिरीत ५.३० वाजता या विद्यार्थ्यांचे रत्नागिरीत आगमन झाले.
ही महत्त्वाकांक्षी सायकल सहल यशस्वी करण्यासाठी गुरुकुल प्रमुख राजेश आयरे, शिक्षक किरण सनगरे, स्वप्नील कर्लेकर, पल्लवी घोसाळे, देवराम दळवी, सुशांत पवार व गुरुकुलचे पालक शिवाजी सरगर, संदीप पाटील यांची मदत झाली. या सायकल उपक्रमाचे यशस्वी आयोजन व नियोजन गुरुकुलचे शिक्षक गौरव प्रकाश पिळणकर यांनी केले. (प्रतिनिधी)