श्री सदस्यांकडून १३० टन कचरा हद्दपार

By admin | Published: March 1, 2017 11:49 PM2017-03-01T23:49:29+5:302017-03-01T23:49:29+5:30

जिल्ह्यात स्वच्छता मोहीम : तब्बल १४२ किलोमीटरचा परिसर झाला चकाचक

130 tonnes of garbage disposal from the members of the members | श्री सदस्यांकडून १३० टन कचरा हद्दपार

श्री सदस्यांकडून १३० टन कचरा हद्दपार

Next



सातारा/पेट्री : समाजप्रबोधनासह समाजसेवेचा अखंड उपक्रम राबविणाऱ्या रायगड जिल्ह्यातील रेवदंडा येथील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या स्मृतिदिनानिमित्त बुधवारी ‘स्वच्छ भारत’ अभियानांतर्गत स्वच्छता अभियान राबविण्यात आले. सातारा, कऱ्हाड, वाई, पाटण, कोरेगाव, मेढा (जावळी) या ठिकाणी राबविण्यात आलेल्या या अभियानात सहभागी झालेल्या ३ हजार २३५ सदस्यांनी अडीच तासांत १३० टन कचरा गोळा केला. जिल्ह्यात एकूण १४२ किलोमीटर अंतरावर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
प्रतिष्ठानच्या वतीने राबवण्यात आलेल्या या अभियानात प्रमुख पाहुणे खासदार उदयनराजे भोसले, नगराध्यक्षा माधवी कदम, उपनगराध्यक्ष राजू भोसले, इर्शाद बागवान, नगरसेवक यशोधन नारकर, वंसत लेवे, किशोर शिंदे, सविता फाळके, श्रीकांत आंबेकर, राम हादगे, महेश पवार, धनंजय जांभळे, विजय काटवटे, मुख्याधिकारी शंकर गोरे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कार्यालयात स्वच्छता अभियानप्रसंगी खासदार उदयनराजे भोसले म्हणाले, ‘डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या अनमोल बोधातून मनुष्याच्या कलुषित मनाला स्वच्छ केले जात आहे. तसेच प्रतिष्ठानचे कार्य कौतुकास्पद आहे.’ नगरपालिकेच्या नगराध्यक्षा माधवी कदम यांनी देखील प्रतिष्ठानच्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढले. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या वतीने सातारा जिल्ह्यात ठिकठिकाणी स्वच्छता अभियान यशस्वीपणे राबविण्यात आले.
या स्वच्छता अभियानाचे नियोजन राज्यपाल नियुक्त स्वच्छतादूत पद्मश्री डॉ. आप्पासाहेब तथा दत्तात्रेय नारायण धर्माधिकारी व त्यांचे चिरंजीव सचिन धर्माधिकारी, उमेश धर्माधिकारी, राहुल धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
जिल्ह्यात राबविल्या गेलेल्या अभियानात ३ हजार २३५ सदस्यांनी सहभाग घेतला. सातारा, कऱ्हाड, वाई, कोरेगाव, पाटण, मेढा या ठिकाणी असलेल्या शासकीय कार्यालयांसह एकूण १४२ किलोमीटर परिसराची स्वच्छता करण्यात आली. एकत्रित केलेला १३० टन कचरा पालिकेच्या कचरा डेपोत टाकण्यात आला. सकाळी आठ वाजता सुरू केलेल्या या स्वच्छता अभियानातून अवघ्या अडीच तासांतच जिल्ह्यातील सहा ठिकाणी संपूर्ण शहर स्वच्छ करण्यात आले.
सातारा शहरात जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा रुग्णालय, आरटीओ कार्यालय, जिल्हा न्यायालय, पोलिस अधीक्षक कार्यालयापासून अभियानास प्रारंभ करण्यात आला. सकाळी साडेसात वाजल्यापासून प्रतिष्ठानमधील सदस्य खोरे, घमेले, खराटे घेऊन या अभियानात सहभागी झाले होते. प्रतिष्ठानमार्फत त्यांना हातमोजे व मास्क पुरविण्यात आले. सातारा, कऱ्हाड, वाई, कोरेगाव, पाटण, मेढा, पाचगणी, धोंडेवाडी, येळगाव, पुसेगाव, खातगुण, उंब्रज, अतीत, चरेगाव, रहिमतपूर, मसूर, वेळे, अनवडी, अभेपुरी, भुर्इंज, प्रभूचीवाडी, करंजे, बाँबे रेस्टॉरन्ट, विक्रांतनगर, अंबवडे, कुडाळ, मारुल हवेली, आगाशिवनगर, कोपर्डे, मल्हारपेठ, वत्सलानगर, किकली, सातारारोड येथील सदस्यांनी अभियानात सहभाग घेतला. (प्रतिनिधी)
शिरवळला एकवटले शेकडो हात
शिरवळ : खंडाळा तालुक्यातील शिरवळ या ठिकाणी महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या विद्यमाने स्वच्छता अभियान राबविण्यात आले.येथील शासकीय विश्रामगृहालगत स्वच्छता अभियानाचा प्रारंभ नूतन जिल्हा परिषद सदस्य उदय कबुले, शिरवळ सरपंच छाया जाधव, माजी सभापती गुरुदेव बरदाडे, ग्रामपंचायत सदस्य रंजना बरदाडे, आप्पासाहेब देशमुख, हरिप्रसाद जोशी, बाळासाहेब जाधव, अ‍ॅड. दिलावर खान यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी शिरवळमधील शासकीय विश्रामगृह, एसटी बसस्थानक, न्यू कॉलनी, बौद्धआळी, शिवाजी कॉलनी आदी ठिकाणी शिरवळ ग्रामपंचायतीच्या सहकार्याने स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी स्वच्छता अभियानामध्ये शिरवळसह विविध गावांतील नागरिक सहभागी झाले होते.

Web Title: 130 tonnes of garbage disposal from the members of the members

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.