१४ कुटुंबांवर बहिष्कार

By admin | Published: March 27, 2015 12:33 AM2015-03-27T00:33:47+5:302015-03-27T00:35:40+5:30

देवस्थानाची बैठक : मळेवाडचा प्रकार; पोलिसांकडे तक्रार

14 boycott of families | १४ कुटुंबांवर बहिष्कार

१४ कुटुंबांवर बहिष्कार

Next

सावंतवाडी : मळेवाड या तंटामुक्त गावातच देवस्थानाच्या बैठकीला १४ कुटुंबांना न बोलावता त्यांच्यावर बहिष्कार घातल्याने एकच खळबळ उडाली आहे. देऊळवाडीत कुलदेवता मंदिर आहे. बैठकीचे निमंत्रण या कुटुंबांना सोडून सर्वांना देण्यात आले. त्यामुळे या कुटुंबांतील सर्वांनी गुरुवारी सावंतवाडी पोलीस ठाणे गाठत नंदकिशोर मुळीक व रमेश मुळीक यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दिली असून, पोलिसांनी मळेवाड पोलीसपाटील दिगंबर मसूरक र यांना प्रकरण गावातच मिटविण्याचे आदेश दिले आहेत.
मळेवाड हे तंटामुक्त गाव आहे. मात्र, याच गावात देवस्थानाच्या विषयावरून गावातील म्हापसेकरवाडीत राहणाऱ्या १४ कुटुंबांना बहिष्कृत करण्यात आले आहे. वाडीतील या १४ कुटुंबांना सोडून इतर कुटुंबांनी कुलदेवता मंदिराची खास बैठक गुरुवारी रात्री आयोजित केली असून, बैठकीला उपस्थित राहावे, असे निमंत्रण दिले होते. या निमंत्रणाचे अधिकार नंदकिशोर मुळीक व रमेश मुळीक यांना दिले होते. त्यांनीच आपणास निमंत्रण देण्यापासून परावृत्त केले असावे, असा संशय व्यक्त केला असून, याबाबत संतोष मुळीक, गोविंद मुळीक, उत्तम मुळीक, नामदेव मुळीक, भरत मुळीक, परशुराम मुळीक, अनुरोध मुळीक आदींनी पोलीस ठाणे गाठत लेखी निवेदन दिले आहे. हा आमच्याच कुटुंबाच्याबाबतीत प्रकार घडल्याचे त्यांनी या तक्रारीत म्हटले आहे.
या तक्रारीनंतर सहायक पोलीस निरीक्षक महेंद्र शेलार व उपनिरीक्षक संदीप दिवटे यांनी सर्व हकिगत ऐकून गावचे पोलीसपाटील दिगंबर मसूरकर यांना या विषयात लक्ष घालण्याची सूचना केली आहे. गावातील हा मंदिराचा विषय असल्याने तो गावातच मिटवावा, असे त्यांनी सांगितले. बहिष्कृत केलेल्या संतोष मुळीक यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले, आम्ही गावातच राहतो. देवस्थानाच्या प्रत्येक कामात भाग घेतो. असे असूनही इतर कुटुंबांना निमंत्रण देण्यात आले, तर आम्हालाच का निमंत्रण दिले नाही? हा बहिष्कार नाही तर काय आहे? आता आम्ही गावातच यावर न्याय मागणार असून, पोलिसांकडे लेखी निवेदन दिल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

 

Web Title: 14 boycott of families

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.