भाचीवर अत्याचारप्रकरणी १४ वर्षे सश्रम कारावास

By admin | Published: January 27, 2017 11:14 PM2017-01-27T23:14:58+5:302017-01-27T23:14:58+5:30

देवगड येथील प्रकरण : जिल्हा, सत्र न्यायालयाचा निकाल

14 years rigorous imprisonment for torture of niece | भाचीवर अत्याचारप्रकरणी १४ वर्षे सश्रम कारावास

भाचीवर अत्याचारप्रकरणी १४ वर्षे सश्रम कारावास

Next


सिंधुदुर्गनगरी : ठाणे येथून आजोळी आलेल्या १२ वर्षीय भाचीवर लैंगिक अत्याचार करून तिला गर्भवती केल्याप्रकरणी आरोपी गुरुनाथ दामोदर जोईल (वय ३५, रा. कातवण, मिठबांव-देवगड) याला येथील जिल्हा व सत्र न्यायालयाच्या प्रधान न्यायाधीश विभा विरकर यांनी १४ वर्षे सश्रम कारावास व बारा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. या खटल्यात अल्पवयीन मुलगी, वडील व डॉक्टरांची साक्ष महत्त्वाची ठरली.
याबाबतचे अधिक वृत्त असे की, आजी आजारी असल्याने तिला पाहण्यासाठी पीडित अल्पवयीन मुलगी (भाची) आईसोबत आजोळी आली होती. आजीला पाहिल्यानंतर आईने मुलीला मामाच्या घरी ठेऊन ठाणे येथील आपल्या घरी परतली. दरम्यान, पीडित मुलगी साडेचार महिने म्हणजेच ६ सप्टेंबर २०१४ ते २८ जानेवारी २०१५ या काळात मामाच्या घरी राहिली. त्यानंतर ती आपल्या ठाणे येथील घरी गेली. त्यानंतर ती गरोदर असल्याचे निष्पन्न झाले. आई-वडिलांनी मुलीस विश्वासात घेऊन प्रकरणाची सखोल चौकशी केली. मामाने आपल्यावर अत्याचार करून या प्रकरणाची कुठे वाच्यता करू नकोस, असे सांगत धमकी दिल्याचे पीडित मुलीने सांगितले. तत्काळ मुलीच्या वडिलांनी देवगड पोलिस ठाणे गाठत झालेला सर्व प्रकार सांगितला. त्यानुसार आरोपी गुरुनाथ जोईल याला ६ मार्च २०१५ ला अटक करीत गुन्हा दाखल केला होता.
दरम्यान, न्यायालयाने हा निकाल देताना नात्यातील व्यक्तीने केलेला हा प्रकार घृणास्पद असल्याचे मत नोंदविले आहे. सरकारी पक्षाच्यावतीने साहाय्यक सरकारी वकील स्वप्निल सावंत यानी काम पाहिले. (प्रतिनिधी)
अशी असेल शिक्षा
या प्रकरणाच्या खटल्याची सुनावणी ओरोस येथील जिल्हा व सत्र न्यायालयात झाली. सर्व साक्षी पुरावे ग्राह्य धरून प्रधान न्यायाधीश विभा विरकर यांनी आरोपीला दोषी धरत १४ वर्षे सश्रम कारावास व १० हजार रुपये दंड व दंड न भरल्यास १०० दिवस जादा सश्रम कारावास, तर दुसऱ्या एका कलमानुसार दोन वर्षे सश्रम कारावास व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा व दंड न भरल्यास २० दिवस सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. ही शिक्षा एकत्रित भोगावयाची आहे.

Web Title: 14 years rigorous imprisonment for torture of niece

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.