जिल्ह्यात १५९२ अंगणवाड्यांना स्वत:च्या इमारतीच नाहीत
By admin | Published: August 28, 2015 11:27 PM2015-08-28T23:27:46+5:302015-08-28T23:27:46+5:30
जिल्हा परिषद : ३४९ अंगणवाड्यांना समाजमंदिर, सार्वजनिक ठिकाणांचा आधार
रहिम दलाल- रत्नागिरी जिल्ह्यातील अंगणवाडी इमारतींच्या बांधकामासाठी अनुदान असतानाही जमीन मिळत नसल्याने १५१२ अंगणवाड्यांना स्वत:च्या मालकीच्या इमारती नाहीत. त्यामुळे ३४९ अंगणवाड्या समाज मंदिर व सार्वजनिक ठिकाणी भरत आहेत.जिल्ह्यात ग्रामीण भागासाठी २८९५ अंगणवाड्या मंजूर असून, २८४१ अंगणवाड्या कार्यरत आहेत़ त्यामध्ये नियमित २२५६ व ५८५ मिनी अंगणवाड्यांचा समावेश आहे़ जिल्ह्यातील १५१२ अंगणवाड्यांना स्वत:च्या मालकीच्या इमारती नाहीत़ त्यामुळे काही अंगणवाड्या खासगी इमारतीमध्ये, प्राथमिक शाळेच्या खोलीमध्ये, तर काही अंगणवाड्या समाज मंदिरात व सार्वजनिक ठिकाणी भरवण्यात येतात़
या अंगणवाड्यांसाठी स्वत:च्या मालकीच्या इमारती असणे आवश्यक आहे़ त्यासाठी जिल्हा नियोजनमधून कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध आहे़ मात्र, जागेअभावी इमारती कशा बांधणार, असा प्रश्न आहे़
सुरुवातीला अंगणवाडीसाठी ३ लाख ५० हजार रुपये देण्यात येत होते़ त्यामध्ये वाढ होऊन ४ लाख ५० हजार रुपये झाले़ त्यानंतर त्यामध्ये आणखी वाढ झाल्याने आता अंगणवाडीची इमारत बांधकामासाठी ६ लाख रुपये अनुदान देण्यात येते़ ज्या ३४१ अंगणवाड्यांच्या इमारती बांधण्यात आल्या होत्या, त्या प्रत्येक इमारतीसाठी ४ लाख ५० हजार रुपये अनुदान मंजूर करण्यात आले होते़
जिल्ह्यात १५१२ अंगणवाड्यांना अजूनही स्वत:च्या मालकीच्या इमारती नाहीत. अनुदान उपलब्ध असतानाही केवळ जमीन मिळत नसल्याने मोठी अडचण होत आहे. या अंगणवाड्यांना स्वत:च्या मालकीच्या इमारती नसल्याने ५८८ अंगणवाड्या खासगी इमारतींमध्ये भरवण्यात येतात. ५७५ अंगणवाड्यांनी प्राथमिक शाळांचा आश्रय घेतला आहे, तर ३४९ अंगणवाड्यांना गावातील समाजमंदिर व इतर सार्वजनिक ठिकाणांचा आधार देण्यात आला आहे.
अंगणवाड्यांच्या इमारतींसाठी जमीन मिळावी, यासाठी दानशुरांना जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाकडून वेळोवेळी आवाहनही करण्यात आले होते. मात्र, त्याला अगदी किरकोळ प्रमाणात प्रतिसाद लाभला. जिल्ह्यातील केवळ २० अंगणवाड्यांना दानशुरांनी आपली जमीन पाच पैसेही न घेता दान केली. त्यामुळे चालू आर्थिक वर्षात २० अंगणवाड्यांना नवीन इमारतींचे बांधकाम करण्यात येणार आहे. या इमारतींच्या बांधकामासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून ४ कोटी रुपयांचे अनुदान प्राप्त झाले आहे. हे अनुदान वेळेत खर्च होणे आवश्यक आहे.
मंडणगड ५८
दापोली ७१
खेड ३५
चिपळूण १९
गुहागर ३३
संगमेश्वर ४४
रत्नागिरी १४
राजापूर ३६
एकूण३४९
आपल्या भागातील अंगणवाडीला स्वत:ची इमारत असावी, असा प्रयत्न जिल्हा परिषद सदस्यांकडूनही होताना दिसत नाही.