साकव दुरूस्तीसाठी १५ कोटी मंजूर
By admin | Published: March 25, 2017 09:46 PM2017-03-25T21:46:35+5:302017-03-25T21:46:35+5:30
पालकमंत्र्यांचे प्रयत्न : ५० लाखांपर्यंतच्या पुलांचे काम तत्काळ सुरू करण्याच्या सूचना
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या प्रयत्नांमुळेच जिल्ह्यातील साकव तसेच पुलांच्या दुरुस्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमवेत दोनवेळा पार पडलेल्या बैठकीत जिल्ह्यातील एकूण ४०२ साकव तसेच २९ पुलांच्या दुरुस्तीला मंजुरी देण्यात आली आहे. यात साकव दुरुस्तीसाठी तब्बल १५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. तसेच ५० लाखांपर्यंतचे पुलांच्या दुरुस्तीचे काम तत्काळ सुरू करण्यासही या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील नादुरुस्त साकवांच्या दुरुस्तीसाठी १५ कोटी रुपये मंजूर होऊनही या कामाला सुरूवात झाली नव्हती. तसेच सावित्री पूल दुर्घटनेनंतर पालकमंत्री वायकर यांनी जिल्ह्यातील सर्व पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्याची सूचना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना केली होती. त्यानुसार याचा आढावा घेण्यासाठी वायकर यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनातील त्यांच्या दालनात सलग दोनवेळा सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेतली होती. या बैठकीला प्रधान सचिव आशिषकुमार सिंग, रस्ते विभागाचे सचिव सी. पी जोशी उपस्थित होते.
रत्नागिरी जिल्हा परिषदेने दुरुस्ती सुचवलेल्या साकवांपैकी ४०२ साकवांच्या दुरुस्तीसाठी १५ कोटी रुपयांची प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. यात उत्तर रत्नागिरीतील एकूण २०७ साकवांच्या दुरुस्तीसाठी सुमारे ८ कोटी रुपये तर सार्वजनिक बांधकाम विभाग, चिपळूण अंतर्गत येणाऱ्या १९५ साकवांच्या दुरुस्तीसाठी सुमारे ६ कोटी ९१ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत.
साकव दुरुस्तीची कामे सद्यस्थितीत निविदास्तरावर आहेत. यात ३ लाखांपर्यंतच्या साकव दुरुस्तीचे टेंडर काढण्यात आले आहे. जिल्ह्यातील कमकुवत झालेल्या पुलांच्या दुरुस्तीबाबतही या बैठकीत चर्चा करण्यात आली. जिल्ह्यातील एकूण २९ पुलांची दुरुस्ती करणे आवश्यक असल्याची माहिती विभागाचे अधीक्षक अभियंता बोबडे यांनी दिली. यात सार्वजनिक बांधकाम विभाग (चिपळूण) अंतर्गत येणाऱ्या एकूण १३ पुलांची दुरुस्ती करणे आवश्यक असून, यासाठी १ कोटी ४५ लाख रुपये इतका तर तर सार्वजनिक बांधकाम विभाग (उत्तर रत्नागिरी) अंतर्गत येणाऱ्या एकूण १६ पुलांची दुरुस्ती करणे आवश्यक असून, यासाठी २ कोटी ११ लाख रुपयांची आवश्यकता आहे. ज्या पुलांच्या दुरुस्तीचा खर्च ५० लाखांपर्यंत आहे, अशा पुलांच्या दुरुस्तीचे काम तत्काळ सुरू करण्याचे आदेश चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. (प्रतिनिधी)
दुरूस्ती आवश्यक
जिल्ह्यातील ग्रामीण भागात साकवांची स्थिती अतिशय बिकट आहे. या साकवांवरून जीव मुठीत घेऊन ग्रामस्थांना ये-जा करावी लागत आहे. त्यामुळे साकवांची दुरूस्ती होणे आवश्यक आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील एकूण २९ पुलांपैकी ५० लाखांपर्यंतच्या पुलांच्या दुरुस्ती कामालादेखील मंजुरी देण्यात आली आहे.
चार साकव अतिधोकादायक
गुहागर तालुका : ८५ पैकी ७२ साकव दुरूस्तीच्या प्रतीक्षेत
लांजात ८७ लोखंडी साकव धोकादायक
जिल्हा प्रशासन जागे : तालुक्यातील ६३ गावांमध्ये १३१ लोखंडी, आरसीसी साकव; डागडुजी होणे गरजेचे.
खेडमधील साकवांची दुरूस्ती २ वर्षे रखडली
संगमेश्वरातील प्रस्तावांना धुळीची डागडुजी
निधीअभावी दुरूस्ती रखडली
चिपळूण तालुका : १५६ पैकी १११ साकवांच्या दुरूस्तीचा प्रस्ताव
९१ साकवांची पडझड