रिफायनरीमुळे दीड लाख नोकऱ्या उपलब्ध : अनिल नागवेकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 05:05 PM2018-07-11T17:05:22+5:302018-07-11T17:06:33+5:30
राजापूर तालुक्यातील नाणार येथील रिफायनरी प्रकल्पामुळे दीड लाख नोकऱ्या उपलब्ध होणार असून या प्रकल्पामुळे पर्यावरणाला बाधा पोहोचत नाही, अशी माहिती रत्नागिरी रिफायनरी प्रकल्पाचे जनसंपर्क अधिकारी अनिल नागवेकर यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
सिंधुदुर्ग : राजापूर तालुक्यातील नाणार येथील रिफायनरी प्रकल्पामुळे दीड लाख नोकऱ्या उपलब्ध होणार असून या प्रकल्पामुळे पर्यावरणाला बाधा पोहोचत नाही. भारतात २३ ठिकाणी रिफायनरी प्रकल्प असून कोकणात हा प्रकल्प पहिलाच आहे. या प्रकल्पामुळे राजापूर शहरात मोठी आर्थिक उलाढाल होणार असून त्याचा फायदा स्थानिकांनाच होणार आहे, अशी माहिती रत्नागिरी रिफायनरी प्रकल्पाचे जनसंपर्क अधिकारी अनिल नागवेकर यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
अनिल नागवेकर पुढे म्हणाले, मुंबईतील चेंबूर येथे २ रिफायनरी प्रकल्प आहेत. त्या ठिकाणी कोणतेही प्रदूषण होत नाही. नाणार येथील प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहे. आता ज्या बागायतदारांकडे मजूर म्हणून काम करीत आहेत त्या मजुरांना किती बागायतदार पीएफ देतात व कोणती सुविधा देतात याचा विरोध करणाऱ्यांनी विचार करावा. प्रकल्पाला विरोध करण्यापेक्षा प्रकल्प काय आहे ते आधी समजून घ्यावे.
शिवसेनेचे पूर्वी या प्रकल्पाला समर्थन होते. आता ते विरोध करीत आहेत. या प्रकल्पामुळे राजापुरात आर्थिक गंगा येणार आहे याचा कोणीही विचारच करीत नसल्याबद्दल अनिल नागवेकर यांची चिंता व्यक्त केली. प्रकल्पाला विरोध करण्यापेक्षा या प्रकल्पामुळे होणाऱ्या फायद्याचा विचार करायला हवा. कोकणातील अनेक पिढ्या यामुळे सुखी होणार आहेत. आता कोकणात ६० ते ७० टक्के लोकांची घरे बंद आहेत. सर्व तरुण मुंबईला नोकरीसाठी जात आहेत.
जमीन मालकांना आपल्या मुलांच्या नोकरीबाबत प्रकल्प व्यवस्थापन हमी द्यायला तयार आहे. शिक्षणाप्रमाणे नोकरी मिळेल. ज्याचे जसे शिक्षण आहे त्या प्रमाणे आयटीआयटी कोर्स देऊन सुशिक्षित बेरोजगारांना घडवण्यात येणार आहे. मात्र, स्थानिकांनी या बाबत प्रकल्प व्यवस्थापनाशी चर्चा करणे आवश्यक असल्याचे अनिल नागवेकर यांनी सांगितले.
प्रकल्पाबाबत अपप्रचार!
केरळ, गुजरात, चेन्नई, कलकत्ता आदी ठिकाणी रिफायनरी प्रकल्प आहेत. या ठिकाणी प्रकल्पग्रस्तांचे कोणतेही नुकसान झालेले नाही. काहीजण हा प्रकल्प कोळशावर चालणारा आहे, असे सांगून प्रकल्पाच्या विरोधात चुकीची माहिती ग्रामस्थांमध्ये पसरवित आहेत. मात्र, प्रकल्पग्रस्तांनी हा प्रकल्प काय आहे हे समजून घेऊन आपल्या मुलांना कशा प्रकारे नोकऱ्या मिळणार आहेत याची कंपनीकडून माहिती करून घेणे आवश्यक आहे.
जर आपल्या मुलांना चांगली नोकरी मिळणार असेल तर जमीन मालकांनी या प्रकल्पाचे समर्थन करणे आवश्यक आहे. या प्रकल्पात कायमस्वरूपी नोकरी असून पीएफ, ग्रॅच्युईटी आदी सर्व सुविधा उपलब्ध होणार आहेत. याचा लाभ जमीन मालकांनी घेऊन आपल्या कुटुंबाच्या भवितव्याचा विचार करावा. या प्रकल्पामुळे आपल्या घरात आर्थिक सुबत्ता येणार आहे, असे त्यांनी सांगितले.