‘उमाळा’ सुशोभिकरणासाठी १५ लाख मंजूर
By Admin | Published: December 10, 2014 10:20 PM2014-12-10T22:20:09+5:302014-12-10T23:52:47+5:30
नाधवडे येथील अद्भुत जलस्त्रोत : लघुपाटबंधारे अधिकाऱ्यांकडून पाहणी
वैभववाडी : नाधवडे येथील अद्भुत नैसर्गिक उमाळ््याचे संवर्धन व सुशोभिकरणासाठी १५ लाख रूपये निधी मंजूर झाला आहे. या निधीतून उमाळ््याच्या मुख्य उगमाचा परिसर पर्यटनदृष्ट्या विकसित केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर लघुपाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी उमाळ््याची पाहणी करून सुशोभिकरणाच्या कामासंदर्भात सूचना केल्या.
विजयदुर्ग-कोल्हापूर राज्य महामार्गापासून सुमारे ७० ते ८० मीटर अंतरावर हा नैसर्गिक उमाळा आहे. हा उमाळाच बारमाही नापणे धबधब्याचा प्रमुख प्रवाह आहे. या उमाळ््यापासून १०० मीटरवर स्वयंभू महादेवाचे आकर्षक मंदिर आहे. त्यामुळे अद्भुत असलेल्या नैसर्गिक उमाळ््याच्या पर्यटन विकासातून जागृत स्वयंभू महादेव मंदिराच्या धार्मिक पर्यटनाला चालना मिळणार आहे. उमाळा ते मंदिर हा संपूर्ण परिसर बारमाही प्रवाही असल्याने कोल्हापूर- विजयदुर्ग मार्गावरील हे पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र बनले आहे. भूगर्भातील घडामोडींमुळे उमाळ््याच्या मुख्य प्रवाहाची तीव्रता काहीअंशी कमी झाल्याचे जाणकारांचे मत आहे. या पार्श्वभूमीवर नैसर्गिक उमाळ््याचे जतन करण्याच्या उद्देशाने प्राथमिक स्वरूपात सुशोभिकरणासाठी पाऊल उचलण्यात येत आहे. उन्हाळ््यात डिझेल पंपाद्वारे टॅँकरने उमाळ््याच्या प्रवाहाचा उपसा केला जातो. त्यामुळे एप्रिल-मे दरम्यान उमाळ््याच्या परिसरातील पाण्यावर तेलकट तवंग दिसू लागतो. त्यामुळे काही प्रमाणात पाणी दूषित होण्याचा धोका असतो. शिवाय जनावरांचा वावर आणि कपडे धुण्याचे प्रमाण वाढते. या साऱ्याचा उमाळ््याच्या मुख्य प्रवाहावर परिणाम होऊ नये म्हणून ३७.४० मीटर लांब व २०.४० मीटर रूंदीचा सुमारे २.५ फूट उंच टॅँक बांधला जाणार आहे.
उमाळ््याच्या प्रवाहाचे पाणी एकत्र करून सुमारे ३ फुटाच्या चेंबरमधून बाहेर सोडले जाणार आहे. त्यामुळे टॅँकमध्ये पालापाचोळा किंवा कोणीही काही वस्तू टाकल्यास त्या आतमध्ये साचून न राहता पाण्याच्या प्रवाहासोबत टॅँकबाहेर पडणार आहेत. या कामासाठी पर्यटन विकास योजनेतून १४ लाख ९७ हजार रूपये मंजूर असून कामाला लवकरच सुरूवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर लघुपाटबंधारेचे कार्यकारी अभियंता जेकब अॅन्थोनी, उपअभियंता आर. बी. बांगडे यांनी उमाळ््याची पाहणी केली. त्यावेळी त्यांच्यासमवेत लघुपाटबंधारे कर्मचारी संतोष टक्केही
होते. (प्रतिनिधी)
बांधकाममार्फत स्वतंत्र प्रस्ताव
उमाळ््याच्या संपूर्ण परिसराच्या पर्यटन विकासाचा १ कोटी ११ लाखाचा परिपूर्ण आराखडा करण्यात आला आहे. त्यामध्ये स्विमिंग टॅँक, ड्रेसिंग रूम, चहुबाजूंनी रेलिंग, बैठक व्यवस्था आदी सुविधांचा समावेश आहे. मात्र लघुपाटबंधारेकडून एवढा निधी मिळणे कठीण असल्याने हा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाममार्फत शासनाला सादर करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.