करूळ घाटात आरामबस उलटून 15 प्रवासी जखमी, बसखाली अडकलेल्या दोन महिलांना वाचविण्यात पोलिसांना यश
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2018 05:19 AM2018-06-23T05:19:40+5:302018-06-23T05:19:52+5:30
गोव्याहून नाशिकला जाणारी खासगी आरामबस करूळ घाटात रात्री उशिरा उलटली. या दुर्घटनेत सुमारे 15 प्रवासी जखमी असून 3 ते 4 जणांना गंभीर दुखापत झाली आहे.
- प्रकाश काळे
वैभववाडी(सिंधुदुर्ग): गोव्याहून नाशिकला जाणारी खासगी आरामबस करूळ घाटात रात्री उशिरा उलटली. या दुर्घटनेत सुमारे 15 प्रवासी जखमी असून 3 ते 4 जणांना गंभीर दुखापत झाली आहे. बसखाली अडकलेल्या दोन महिला प्रवाशांना दोन तासांनी बाहेर काढण्यात पोलीसांना यश आले आहे. जखमींना कोल्हापूरच्या 'सीपीआर' रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या आठवड्यात तळेरे कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर झालेला हा तिसरा भीषण अपघात आहे.
पोलिसांतून मिळालेल्या माहितीनुसार करूळ येथील पोलीस तपासणी नाक्यापासून घाटात सुमारे दीड किलोमीटरवर गोव्याहून नाशिकला निघालेली 'साईरुचा' ही खासगी आरामबस (एमएच-15-एफव्ही- 9595) चालकाचा ताबा सुटल्याने रस्त्याच्या कडेला उलटली. बहुतांश प्रवासी बसमधून कसेबसे बाहेर निघाले, मात्र दोन महिला प्रवासी बसखाली अडकल्या होत्या.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. बसखाली अडकलेल्या महिलांना काढण्यासाठी अनेक क्लृप्त्या वापरून पोलिसांनी अखेर दोन तासांनी त्यांची सुटका केली. दरम्यान सर्व जखमींना रुग्णवाहिकेतून कोल्हापूरच्या 'सीपीआर' रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताच्या बचावकार्यामुळे काही काळ घाटातील वाहतूक विस्कळीत झाली होती. परंतु आरामबस रस्त्याच्या कडेला उलटल्याने करूळ घाटातील वाहतूक सुरळीत आहे.
पोलिसांच्या बचावकार्याला सॅल्युट !
तळेरे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर आठवड्याभरात झालेल्या या तिस-या भीषण अपघातात जखमी अवस्थेत चालक अथवा प्रवासी अडकून पडले. आधीच्या दोन अपघातात अडकलेल्या जखमींसाठी देवदूत ठरलेले पोलीस नाईक राजेंद्र खेडकर तसेच पोलीस नाईक रवींद्र देवरुखकर यांनी अन्य सहका-यांच्या मदतीने आरामबसखाली अडकलेल्या दोन महिला प्रवाशांना वाचविले. त्यासाठी जेसीबी वेळेत उपलब्ध न झाल्यामुळे अंधारात हाताने खणून सुमारे दोन तासांनी बस खाली अडकून पडलेल्या दोन्ही महिलांना वाचविण्याची पुन्हा एकदा किमया करून दाखविली आहे. त्यामुळे पोलिसांच्या बचावकार्याला 'सॅल्युट'च केला पाहिजे.