ओरोस येथे १५ रोजी 'जातीय प्रवृत्तीचा मडका फोड' आंदोलनांतर्गत मोर्चा!
By सुधीर राणे | Published: September 11, 2022 04:17 PM2022-09-11T16:17:24+5:302022-09-11T16:18:41+5:30
परिवर्तनवादी विचारसरणीचे हजारो लोक सहभागी होणार
लोकमत न्यूज नेटवर्क
कणकवली(सुधीर राणे): मानवतेला काळीमा फासणाऱ्या अनेक घटना देशभरात घडत आहेत . तसेच सिंधुदुर्ग जिल्हयातही जातीय अत्याचाराचे प्रकार घडत असतात. त्याला आळा बसावा या उद्देशाने जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीसह सर्व बौद्ध धर्मिय, चर्मकार समाज, मुस्लिम संघटनांनी मिळून ' जातीय प्रवृत्तीचा मडका फोड'आंदोलना अंतर्गत मोर्चा आयोजित केला आहे.
हा मोर्चा गुरुवार १५ सप्टेंबरला सकाळी ११.३० वाजता ओरोस येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणार आहे . मोर्चामध्ये परिवर्तनवादी विचारसरणीचे लोक हजारोंच्या संख्येने सहभागी होणार असल्याचा विश्वास विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी येथे व्यक केला. या मोर्चाच्या नियोजनाची माहिती देण्यासाठी कणकवली, टेंबवाडी येथील म्हाळसाबाई हिंद छात्रालय येथे रविवारी पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष महेश परुळेकर, कास्ट्राईबचे संघटनेचे जिल्हाध्यक्ष संदीप कदम , सत्यशोधक संघटनेचे नेते अॅड. सुदीप कांबळे, चर्मकार समाज उन्नती मंडळाचे जिल्हाध्यक्ष सुजीत जाधव , सरचिटणीस चंद्रसेन पाताडे ,भारतीय चर्मकार समाज संघटनेचे जिल्हा सरचिटणीस चंद्रकांत पवार , वंचित आघाडीचे जिल्हा महासचिव प्रमोद कासले, वंचितचे जिल्हा युवक आघाडी अध्यक्ष रोहन कदम , कणकवली तालुकाध्यक्ष संजय जाधव , उपाध्यक्ष संजय तांबे ,चर्मकार संघटनेचे तालुकाध्यक्ष महानंदा चहाण , कास्ट्राईबचे किशोर कदम आदी उपस्थित होते.
सुजित जाधव म्हणाले, जिल्हात बौद्ध व चर्मकार समाज एकत्र येऊन पहिल्यांदाच अशा प्रकारच्या भव्य मोर्चाचे आयोजन करत आहे.मुस्लिम समाजाशीही आमचे बोलणे सुरु आहे. यापुढे जिल्ह्यातील अनुसूचित जाती जमातीचे लोक अन्याय सहन करणार नाहीत. या मोर्चाद्वारे आमच्या एकीची ताकद दाखविणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, १५ सप्टेंबर रोजी मोर्चेकरी सकाळी ११ वाजता ओरोस येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकडे जमणार आहेत . तेथे पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघणार आहे. तिथे मोर्चाचे सभेत रुपांतर होईल जिल्हाधिकारी यांना निवेदन दिल्यानंतर त्यांच्याशी झालेल्या चर्चेची माहिती मोर्चेकऱ्यांना दिली जाईल. मोर्चात शालेय विद्यार्थी अग्रस्थानी असतील. असेही यावेळी महेश परुळेकर,संदीप कदम म्हणाले.