सिंधुदुर्गकन्या १५ वर्षीय अंशिता करणार मुंबई टेबल टेनिस संघाचे प्रतिनिधित्व
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2022 12:25 PM2022-11-14T12:25:39+5:302022-11-14T12:26:49+5:30
पुणे येथे होणाऱ्या ८४ व्या राज्यस्तरीय वरिष्ठ टेबल टेनिस चॅम्पियनशिप स्पर्धेत ती मुंबई संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. या तिच्या निवडीबद्दल विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.
निकेत पावसकर
तळेरे: कणकवली तालुक्यातील साळिस्ते ताम्हणकरवाडी येथील १५ वर्षीय अंशिता अशोक ताम्हणकर हिची १९ वर्षाखालील मुलींच्या मुंबई संघाच्या कर्णधार पदी निवड झाली आहे. पुणे येथे होणाऱ्या ८४ व्या राज्यस्तरीय वरिष्ठ टेबल टेनिस चॅम्पियनशिप स्पर्धेत ती मुंबई संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. या तिच्या निवडीबद्दल विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.
मुळची कणकवली तालुक्यातील साळिस्ते ताम्हणकरवाडी येथील सहदेव गोपाळ ताम्हणकर यांची नात असलेली अंशिता मुंबई शहराची एक नंबरची खेळाडू असून तिने अनेक स्पर्धा गाजविल्या आहेत. वयाच्या सातव्या वर्षांपासून अंशिता टेबल टेनिस खेळत असून ती स्पिनॅर्ट अकॅडमी मधून आंतरराष्ट्रीय खेळाडू परेश मुरेकर आणि चार्वी कावले यांच्याकडे या खेळाचे प्रशिक्षण घेत आहे. मुंबई येथे नुकत्याच पार पडलेल्या ५ स्टार मुंबई शहर, जिल्हा नामाकंन टेबल टेनिस स्पर्धेमधील १९ वर्षाखालील प्रतिस्पर्धी खेळाडूचा पराभव केल्यामुळे तीची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली होती.
पुन्हा कर्णधार पदाची धुरा !
यापूर्वी ८१ व्या राज्यस्तरीय टेबल टेनिस चॅम्पियनशिप स्पर्धेत तिने मुंबई संघाचे १२ वर्षाखालील मुलींच्या संघाचे कर्णधार म्हणुन प्रतिनिधित्व केले होते. यावेळी पुन्हा १९ वर्षाखालील मुलींच्या मुंबई संघाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी अंशिताची निवड झाली आहे.
घरात फारसे खेळाचे वातावरण नसतानाही केवळ स्वत: च्या जिद्दीवर ती या खेळात यश संपादन करत आहे. ती प्रतिस्पर्धी कितीही वयाच्या खेळाडूसमोर खेळून प्रतिस्पर्ध्याच्या पारड्यातील अनेक सामने विजयी झाली असल्याची प्रतिक्रीया तिचे वडिल अशोक ताम्हणकर यांनी दिली. सिंधुदुर्ग कन्या अंशिता ही प्रचंड मेहनती खेळाडू असून अनेक स्पर्धांमध्ये आपल्या कठोर मेहनतीच्या जोरावर विजय मिळवत आपली यशस्वी वाटचाल सुरु ठेवली आहे.
पदकांची लयलूट!
- यावर्षीच्या हंगामात अंशिता हिने पदकांची लयलूट केली. संपूर्ण मुंबईतील शाळांमध्ये १६ वर्षाखालील इंटरस्कूल स्पर्धेतील मुलींमध्ये रजत (ब्रॉंझ) पदक मिळविले. तर या हंगामात ५ सुवर्ण, २ कांस्य तर २ रजत असे एकूण ९ पदकांची लयलूट केली आहे.
- पुणे येथे १९ ते २२ नोव्हेंबरला होणार्या ८४ व्या राज्यस्तरीय टेबल टेनिस चॅम्पियनशिप स्पर्धेत ती मुंबई संघाची कर्णधार म्हणून खेळणार आहे. तर रत्नागिरी डेरवन येथे २ ते ५ डिसेंबर ला होणाऱ्या ज्युनियर चाम्पियनशिपसाठी तीची निवड झालेली आहे. या तिच्या वाटचालीत तिचे प्रशिक्षक परेश मुरेकर आणि चार्वी कावले, आई वडिल अशोक ताम्हणकर आणि आरती ताम्हणकर यांचा मोठा सहभाग आहे.