दहा स्थानकांसाठी १५0 कोटींचा निधी
By Admin | Published: June 17, 2016 10:16 PM2016-06-17T22:16:52+5:302016-06-17T23:51:46+5:30
सुरेश प्रभू यांची माहिती : खारेपाटण रेल्वेस्थानकाचा शिलान्यास समारंभ
खारेपाटण : कोकण रेल्वे ही केवळ कोकणचीच नाही तर महाराष्ट्राबरोबर गोवा, कर्नाटक, केरळ या राज्यांचीही जीवनरेखा बनली आहे. सिंधुदुर्गचे प्रवेशद्वार असलेल्या खारेपाटण गावातील रेल्वेस्थानकामुळे खारेपाटण परिसराचा विकास होणार असून, या स्थानकासाठी १५ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. कोकण रेल्वे मार्गावरील अन्य १० स्थानकांसाठी १५० कोटींच्या निधीची तरतूद केली आहे. तर कोकण रेल्वेच्या दुपदरीकरणाचे कामही प्रगतीपथावर आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केले.खारेपाटण येथील नवीन रेल्वेस्थानकाचा शिलान्यास समारंभ व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून रिमोट कंट्रोलने गोवा-मडगाव येथून सुरेश प्रभू यांनी केला. यावेळी मडगाव येथे गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसूझा, गोवा विधानसभा अध्यक्ष अनंत शेट, रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता, आदी अधिकारी उपस्थित होते.
तर या कार्यक्रमाचा आॅनलाईन शिलान्यास सोहळा खारेपाटण येथील शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालयाच्या सभागृहात झाला. यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभूगावकर, भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, माजी आमदार राजन तेली, प्रांताधिकारी संतोष भिसे, खारेपाटण सरपंच तृप्ती माळवदे, चिंचवली सरपंच अनिल पेडणेकर, संघर्ष समिती अध्यक्ष नासिर काझी, उपसरपंच कमलेश धुमाळे, कोकण रेल्वेचे अधिकारी राजेंद्र कुमार, महाप्रबंधक सिद्धेश्वर तेलगू, बाळासाहेब निकम, रत्नप्रभा वळंजू, बाळा जठार, रवींद्र शेट्ये, अॅड. हर्षद गावडे, सचिन सावंत, कांताप्पा शेट्ये, आदी उपस्थित होते. कोकण रेल्वेच्या दुपदरीकरणाच्या कामाला सुरवात करण्यात येत असून रोहा ते वीर दरम्यान हे काम चालू आहे. हे काम सूरू असताना रेल्वे सेवेत कोणताही खंड पडणार नाही याची दक्षता घेण्याची सूचना अभियंत्यांना देण्यात आली आहे. सावंतवाडी टर्मिनस होणार नाही, अशी भाषा करणाऱ्यांना सांगावेसे वाटते की, १९ जून रोजी टर्मिनसच्या कामाचा प्रारंभ होेणार आहे. याच वेळी कोकण रेल्वेच्या व भारतीय रेल्वेच्या विविध उपक्रमांचाही प्रारंभ होईल.
देवगड जामसंडे येथे फळप्रक्रिया उद्योगावर आधारित प्रकल्प निर्मिती तसेच विजयदुर्ग-वैभववाडी-कोल्हापूर मार्ग व चिपळूण-कराड रेल्वे मार्गाचे कामदेखिल येणाऱ्या काळात हाती घेण्यात येणार आहे.
खारेपाटण येथील सुख नदीवर ब्रीज बांधून रत्नागिरी व सिंंधुदुर्ग जिल्ह्याला रेल्वेशी जोडण्यात येणार आहे. असेही प्रभू म्हणाले.
खारेपाटण रेल्वेस्थानकाचे आॅनलाईन भूमीपूजन सुरेश प्रभू यांच्या हस्ते झाल्यानंतर चिंचवली येथे रेल्वे स्थानकाच्या नियोजित जागी खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते कामाचा श्रीफळ वाढवून प्रारंभ करण्यात आला. (वार्ताहर)
संघर्ष समिती, समन्वय समिती व्हावी
मंत्री सुरेश प्रभू म्हणाले, खारेपाटण रेल्वेस्टेशन हे रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याला जोडणारे स्थानक आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावरती असल्याने त्याला महत्त्व आहे. या रेल्वे-स्थानकाच्या माध्यमातून खारेपाटणला गतवैभव प्राप्त होईल. या रेल्वेस्थानकासाठी स्थापन करण्यात आलेल्या संघर्ष समिती ऐवजी समन्वय समिती म्हणून ती यापुढे कार्यरत व्हावी.